डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आदेश पालिका प्रशासने दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याप्रमाणे होताना दिसत नाही. यामुळे आता दुसरे अनेक पर्याय म्हणून `स्वच्छ डोंबिवली सुंदर डोंबिवली` असा प्रयत्न डोंबिबलीकर करण्याच्या प्रयत्नात आहेत. याचाच भाग म्हणून डोंबिवलीतील ११ नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील एक सोसायटी हेरून त्या सोसायटीतील ओला आणि सुका कचरा वेगळा करणे आणि प्लास्टिकमुक्त शहर करण्याचे ठरविले आहे. यासाठी मुंबईतील रुईय्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या प्लास्टिकमुक्त प्रोजेक्टची डोंबिवलीत घेणार दखल घेणार आहेत.
काल त्या विद्यार्थ्यांनी सदर प्रोजेक्ट महापालिका “ग” प्रभाग समिती सभापती खुशबू चौधरी यांच्या कार्यालयात सादर केला. यावेळी रोहन नागोटकर यांच्याबरोबर महाविद्यालयात शिकत असलेले रमा नामजोशी, आनंद करंडे, मुकुंद बाबळे, गौरव भाटकर आणि ऋषीकेश गावडे यांनी कोणत्या पद्धतीने सोसायटीमधील ओला आणि सुका कचरा वेगळा होईल हे सांगितले. ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात अशा प्रकारे केलेला हा पहिलाच प्रोजेक्ट असल्याचा दावा रोहन नागोटकर यांनी केला आहे. यावेळी नगरसेवक महेश पाटील, निलेश म्हात्रे, संदीप पुराणिक, नगरसेविका सायली विचारे यांच्यासह पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होत.
प्रत्येक घरातून ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा असे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले आहेत. त्यानुसार निवड करण्यात येणाऱ्या सोसायटीत ओला कचऱ्याचे खत तयार केले जाणार आहे. हे खत संस्थाना मोफत दिले जाईल. तर सुका कचरा पालिकेच्या डंपिंग ग्राउंड मध्ये जाईल. यासाठी समितीतील ११ नगरसेवक त्या सोसायटीतील सदस्यांबरोबर चर्चा करणार आहेत. नागरिकांची साथ मिळाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानानुसार आम्ही अकरा नगरसेवक आपापले प्रभाग कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे खुशबू चौधरी यांनी सांगितले. तर अंबिकानगर प्रभागात याविषयी एका सोसायटीबरोबर चर्चा करणार असल्याचे तेथील नगरसेवक महेश पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्लास्टिकमुक्त प्रोजेक्टची दखल घेऊन काम करणाऱ्या आणि “स्वच्छ डोंबिवली सुंदर डोंबिवली`साठी झटणाऱ्या त्या आदर्श सोसायटीना १५ ऑगस्टला आम्ही बक्षीस देणार.