डोंबिवलीत भरदिवसा रिक्षाचालकाकडून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न दोन तरुणांनी पाठलाग करून पकडले रिक्षाचालकाला
डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाने भरदिवसा एका महिलेला रिक्षात जबरदस्तीने बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान पूर्वेकडील गांधीनगर येथील जकात नाक्याजवळ घडली. इतक्यात मोटरसायकलीवरून आलेल्या दोन तरुणांनी रस्त्यावरील एका महिलेचा आरडाओरड ऐकल्यावर त्या रिक्षाचा पाठलाग करून त्या रिक्षाचालकाला पकडले. त्या रिक्षाचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
शंकर विसलावथ असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे आहे. मात्र रिक्षाचालकाला पकडणाऱ्या त्या दोन तरुणाचे नाव समजू शकले नाही. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भाजपच्या पदाधिकारी मनीषा राणे ह्या त्याच्या मैत्रिणीबरोबर स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या. स्टार कॉलनी येथे आल्यावर त्यांनी विसलावथ याच्या रिक्षात बसल्या. मात्र त्यावेळी एका वृद्ध पेंढारकर कॉलेजजवळ जाण्यासाठी त्या रिक्षाजवळ आला. जास्त भाडे मिळेल म्हणून रिक्षाचालकाने त्या त्या महिलांना स्टेशनला जाणार नाही असे सांगत त्या वृद्धास रिक्षात बसवले. संतापलेल्या त्या महिलांनी रिक्षाचालकाला याचा जाब विचारला. त्यामुळे रिक्षाचालकाने त्या महिलेशी वाद घालत रिक्षात कॊणालाही न बसवता निघून गेला. त्या महिला दुसऱ्या रिक्षात बसून जात असताना गांधीनगर येथील जकात नाक्याजवळ त्या रिक्षाचालकाला बघितले. त्यांनी रिक्षातून उतरून रिक्षाचालक विसलावथ याला त्याबद्दल जाब विचारला. काही वेळाने मुजोर रिक्षाचालकाने त्या एका महिलेला जबरदस्ती रिक्षात बसून रिक्षा सुरु केली. त्यावर राणे यांनी आरडाओरड सुरु केली. त्यावेळी मोटरसायकलीवरून जात असलेल्या दोन तरुणांना राणे यांनी त्या रिक्षाचालकाला पकडण्यास सांगितले. त्या तरुणांनी रिक्षाचा पाठलाग करत रिक्षासमोर आपली मोटारसायकल थांबवली. त्यानंतर त्या रिक्षाचालकाला पकडले. त्या तरुणांनी रिक्षाचालक विसलावथ याला पकडून मानपाडा पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी भाजपा पदाधिकरी राणे याही पोलीस ठाण्यात आल्या. राणे यांच्या मैत्रिणीच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात त्या रिक्षाचालकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.