डोंबिवली, दि. २२ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाला डोंबिवली विभागासाठी परिवहनच्या बस चालविण्यास आज मुहूर्त मिळाला. येथील प्रवाश्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. येथील प्रवासी रिक्षा प्रवासाला कंटाळल्याने पूर्व भागात पालिकेच्या बस द्या अशी मागणी करीत होते. अखेर आज परिवहन सभापती संजय पावशे यांच्या साक्षीने पालिकेची बस सोडण्यात आली.
पूर्वेकडील लोढा हेवन, निळजे रेल्वे स्थानक, पी अँड टी कॉलनी, गोग्रासवाडी आदी मार्गांवर पालिकेच्या बस धावणार आहेत. पालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळील पाटकर रोड येथून सभापती संजय पावशे यांनी पूर्व विभागासाठी बस सोडली यावेळी विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, परिवहन व्यवस्थापक टेकाळे, वाहतुक विभागाचे गंभीरे, परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, राजु दीक्षित, सुभाष म्हस्के, संतोष चव्हाण, नाना यशवंतराव, संजय राणे, प्रसाद माळी यांच्यासह डोंबिवलीकर प्रवासी नागरिकानी गर्दी केली होती. परिवहन उपक्रमाने जरी या मार्गावर बसेस सोडल्या असल्या तर त्या वेळेवर धावतील याकडे लक्ष दिले पाहिजे. बस वेळेवर धावल्या तरच प्रवाश्यांना त्याचा फायदा होईल. नाहीतर प्रवासी वेगळा पर्याय शोधतील आणि पुन्हा प्रवासी नाहीत म्हणून नेहमीप्रमाणे बस मार्ग बंद पडून “ये रे माझ्या मागल्या” अशी वेळ परिवहन उपक्रमाची होईल अशी चर्चा होती.