देवदूत व्यक्तिमत्वाची अनोखी अदा : चिंतातुर पित्याच्या मुलीच्या लग्नाला दिलदार प्रल्हाद म्हात्रे यांची आर्थिक मदत

डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) :  समाजात रितीरिवाजानुसार मुलीचे लग्न करणे म्हणजे मुलीच्या वडिलांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह असते. पण अशावेळी जर कोणी  देवदूत मदतीला आला तर मोठे भाग्यच असते. आणि असे भाग्य डोंबिवलीच्या वधूपित्याला मिळाले आहे.  डोंबिवलीतील देवदूत म्हणून ओळखले जाणारे प्रल्हाद म्हात्रे पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी सामाजिक कार्यात पुढे आले आहेत. त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कार्यामुळे दीपक पटेल यांची मुलीच्या लग्नाची चिंता दूर झाली आहे.

सध्याच्या वाढत्या महागाईच्या दिवसात सर्वसामान्य माणसाला घर संसार चालविणे जिकरीचे झाले आहे .तेथे एखाद्या गरीबाची अवस्था आणखीनच बिकट होते. अशा गरीबाच्या घरात एखादी मुलगी लग्नाची असेल तर तिचे लग्न कसे करायचे ? हा मोठा प्रश्न आई – वडिलांना सतावत असतो. आणि अशीच  स्थिती डोंबिवलीतील पटेल यांची होती. घरची आर्थिक स्थिती गरीब असल्याने गेल्या दोन वर्षापासून मुलीचे लग्न करता येत नव्हते .मात्र मुलीच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या आई – वडिलांची चिंता केडीएमटीचे मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी दूर केली. त्यांनी त्या मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारल्याने  तिचा साखरपुडा नुकताच पार पडला.

डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा येथील लक्ष्मी निवास नावाच्या अत्यंत जुन्या इमारतीत भाड्याच्या खोलीत दीपक अंबालाल पटेल राहतात. त्यांची पत्नी नीता, मुलगी भावना आणि मुलगा भावेश असे त्यांचे चौकोनी कुटुंब आहे. दीपक पटेल हे एका किराणा मालाच्या दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात कमविणारी व्यक्ती एक आणि खाणारी तोंडे चार, त्यातच पत्नीच्या आजारपणामुळे तिला नोकरी देखील करता येत नाही अशी स्थिती होती. मुलगी भावना (२४) आणि मुलगा भावेश (२२) या दोघांचे कसेबसे प्राथमिक शिक्षण झाले. मुलगी भावना हिचे लग्नाचे वय झाले होते. मात्र रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करण्याएव्हढी आर्थिक स्थिती नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून तिचे आई वडील चिंतेत होते. कारण मुलीला मिळणारा नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंब हे साध्या पद्धतीने लग्नाला तयार होतील का हा प्रश्न होता. मुलीचे लग्न करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून मुलीचे लग्न जमत नाही ही गोष्ट मनसेचे प्रल्हाद म्हात्रे याना कळली. लगेच त्यांनी मुलीचे आई वडिलांना बोलावून घेतले.  मुलीसाठी चांगला मुलगा शोधा तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो असा शब्द दिला.

त्याप्रमाणे आई वडिलांनी आपल्या मुलीसाठी वर शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार पुण्यातील राहुल सोलंखी हा रेल्वेत मेकेनिक असलेल्या मुलाशी भावनाचा विवाह ठरविण्यात आला. नुकताच या दोघांचा पश्चिम येथील मराठा मंदिर सभागृहात साखरपुडा झाला. विशेष म्हणजे ज्या लहानग्या मुलाच्या जीवासाठी वैद्यकीय मदतीला धावून जाणाऱ्या प्रल्हाद म्हात्रे यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्यात घेतलेली धाव वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. त्यांच्या कार्याला डोंबिवलीकर सलाम ठोकत आहेत.