रासरंग”च्या भव्य शामियानात होणार दांडियाची बरसात

डोंबिवली, दि. १४ (प्रतिनिधी) : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक शहर अशी आपली ओळख कायम ठेवत आपल्या सांस्कृतिक परंपरेच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवण्यासाठी डोंबिवली शहर सज्ज झाले असून येत्या नवरात्रीत डोंबिवलीकरांची पावलं ‘डोंबिवली रासरंग 2017’ च्या तालावर थिरकणार आहेत.दिनांक 21 ते 29 सप्टेंबर असे नऊ दिवस डोंबिवली पूर्व येथील डी.एन.सी. शाळेच्या प्रांगणात डोंबिवलीतील सर्वात मोठा दांडिया फेस्टिवल साकारणार आहे.

विविध परंपरा उत्सव तरुणाईच्या जल्लोषात साजरा करणारे आपले डोंबिवली शहर ‘डोंबिवली रासरंग 2017’ साठी सज्ज झाले असून त्याविषयीची माहिती खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळराव लांडगे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, परिवहन सभापती संजय पावशे, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक दिपेश म्हात्रे, उपशहरप्रमुख विवेक खामकर, महिला शहरसंघटक कविता गावंड, उपशहर संघटक मधुमती शिसोदे, माजी नगरसेवक रवि म्हात्रे, युवासेना कल्याण तालुका अधिकारी योगेश म्हात्रे, जितेन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दांडिया फेम मनीषा सावला यांची धम्माल गाणी आणि बिपिनचंद्र चुनावाला यांच्या बीटर्झ बँडसह पार्थ गांधी, सिद्धेश जाधव, निरंजना चंद्रा आदींच्या गाण्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहपूर्ण वातावरणात रमणार असून हिंदी, मराठी, गुजराती मालिका चित्रपटांतील सुप्रसिद्ध कलाकार या ‘डोंबिवली रासरंग 2017’ या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. या सोहळ्यात स्त्रियांसाठी मराठमोळ्या संस्कृतीने बहरलेला भोंडला हा खेळ खेळला जाणार असून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीतील महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. डोंबिवलीच्या नागरिकांसाठी भव्य प्रमाणावर खेळवला जाणारा हा एक प्रोफेशनल दांडिया असून यामध्ये महिलांसाठी, कुटुंबासाठी वेगळे विभाग असणार आहेत. माहिती खा. डॉ. शिंदे यांनी दिली. प्रत्येक दिवशी उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना विशेष पारितोषिकेही देण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले. डोंबिवलीकरांची रसिकता आणि इथल्या तरुणाईची सळसळती उर्जा या ‘डोंबिवली रासरंग 2017’ ला यशस्वी करेल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.डोंबिवली शहराने आपली सांस्कृतिक ओळख नेहमीच जपली आहे. इथल्या तरुणाईने या शहराला तरुण ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. त्यामुळे‘डोंबिवली रासरंग 2017’ सारखा सर्वात मोठा दांडिया महोत्सव या सांस्कृतिक शहरात होणे, संयुक्तीक असल्याचे ते म्हणाले. गुढीपाडव्याची शोभायात्रा असू देत किंवा गणेशोत्सव,प्रत्येक उत्सव साजरा करताना डोंबिवलीकरांनी आपली संस्कृती जपत जल्लोषाची परंपरा नेहमीच जपली आहे. ‘डोंबिवली रासरंग 2017’ हा नऊ दिवस चालणारादांडिया महोत्सव उत्साहाची हीच उत्सवी परंपरा कायम ठेवणार आहे. हा दांडिया महोत्सव हा डोंबिवलीकरांचा आपला महोत्सव असून डोंबिवलीकर नागरिकांनी आणि तरुणाईने यात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी केले.