अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याला मूर्तस्वरूप येणार [ महापौर देवळेकर यांचे आश्वासन ]

डोंबिवली : मागील दहा वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालय शेजारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीस पालिका प्रशासन डोळेझाक करीत होते. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख अंकुश गायकवाड यांनी एक दिवसीय उपोषण आज केले. सदर उपोषणाची महापौर राजेंद्र देवळेकर यांनी तत्काळ दखल घेतली. कोणत्याही परिस्थितीत 14 एप्रिल, 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पूर्णकृती उभारणार असे आश्वासन दिले. पालिका प्रशासन आणि महापौर यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून अखेर गायकवाड यांनी उपोषण मागे घेतले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेली सुमारे 20 वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा डोंबिवली शहरात व्हावा अशी जोरदार मागणी होती. यासाठी जनआंदोलनेही झाली. परंतु थातूर-मातुर आश्वासने देवून गप्प बसविण्यात येत होते. या पद्धतीने आंबेडकर अनुयायिनची दिशाभूल होत होती. दरम्यान 15/12/2009 रोजी तत्कालीन नगरसेवक तशा आरपीआय कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी महासभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा ठराव मांडला आणि सचिन बासरे यांच्या अनुमोदनाने ठराव सर्वानुमते मंजूर झाला तेव्हा महापौर तथा पीठासीन अधिकारी रमेश जाधव होते. परंतु असे असतांनाही पालिका प्रशासन डोळेझाक करीत होते. यामुळे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्यासाठी निषेध आंदोलन आज छेडण्यात आले.

सदर निषेध उपोषणाची महापौर राजेंद्र देवळेकर यांनी तत्काळ दखल घेतली. पूर्वेकडील इंदिराचौक येथील उपोषण ठिकाणी स्वतः महापौर देवळेकर आणि सभागृह नेते राजेश मोरे यांनी भेट दिली. यावेळी महपौर यांनी सांगितले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. यासाठी लागणाऱ्या विविध विभागाच्या परवानग्या घेण बंधनकारक असून त्यातील काही परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. ब्रान्झ धातूचा पुतळा बसविण्याचे काम देखील सुरु असून पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम सूर करण्यात येणार आहे. येत्या 14 एप्रिल 2018 रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिनी पूर्णाकृती पुतळ्याला मूर्तस्वरूप येईल असे जाहीर केले.

महापौर देवळेकर यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, डोंबिवली शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड, युवक जिल्हा अध्यक्ष जय जाधव, युवक अध्यक्ष सतीश पवार, डोंबिवली शहर उपाध्यक्ष वसंत टेकाळे, राजू तुपे, शहर सचिव दिनेश साळवे, कार्याध्यक्ष किशोर मगरे, उपाध्यक्ष दिलीप काकडे, संपर्क प्रमुख तुकाराम पवार, संघटक प्रमुख समाधान तायडे, युवक आघाडी डोंबिवली शहर सचिव महेश येवले, महिला संघटक ज्योत्स्ना रोकडे यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपोषण मागे घेतले.