प्रल्हाद म्हात्रे यांनी घेतले “किक बॉक्सिंग” खेळाडूचे पालकत्व [ डोंबिवलीतील हा काजवा नक्कीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुर्यासारखा प्रकाशमान होईल ]

डोंबिवली : तरुणांनो व्यक्तिमत्व विकास करा अशी बोंब सरकार मारत असलं तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. कोणत्याही क्षेत्रात विकास साधायचा असेल तर कोणीतरी पाठीवर थाप मारायलाच पाहिजे. अशीच परिस्थिती येथील “कीक बॉक्सिंग” मध्ये करियर करणाऱ्या खेळाडूची आहे. मात्र अशा परिस्थितीत येथील  दानशूर तथा गरिबांचे कैवारी तथा मनसे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे पुन्हा एकदा धावून आले आहेत. त्यांनी “कीक बॉक्सिंग” खेळाडू अक्षय गायकवाड याचे एक वर्षाचे आर्थिक पालकत्व घेतले आहे. अक्षयला वर्षभर स्पर्धेसाठी लागणारा आर्थिक भार स्वतः म्हात्रे उचलणार असुन त्याप्रित्यर्थ पहिल्या खर्चाचा धनादेश गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर अक्षयला दिला.

पश्चिमकडील गायकवाडवाडी येथील अक्षय बळीराम गायकवाड याला “किक बॉक्सिंग” खेळात प्राविण्य मिळवायचे आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगीरी करायची आहे. परंतु अक्षयची परिस्थिती बेताचीच आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी प्रल्हाद म्हात्रे यांची भेट घेवून त्यांच्याकडे आपली समस्या मांडली. परंतु काही कारणास्तव म्हात्रे यांना समस्या सोडविणे शक्य झाले नाही. दरम्यान एका कार्यक्रमात अक्षयच्या सत्कार सोहळ्याचे साक्षीदार स्वतः प्रल्हाद म्हात्रे असल्याने त्यांनी निर्णय घेतला कि, “कीक बॉक्सिंग” मध्ये करियर करू पाहणाऱ्या अक्षयचे वर्षभराचे पालकत्व घ्यायचे.

अक्षय गायकवाड याने “कीक बॉक्सिंग” स्पर्धेत अहमदनगर राज्यस्तरीय स्पर्धेत २०१६ रोजी कास्यपदक, दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक, आंतरराष्ट्रीय कीक बॉक्सिंग सेमिनार व राष्ट्रीय संघ निवडीमध्ये २०१७ रोजी सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच तुर्कमोनिस्तान येथे एशियन कीक बॉक्सिंग स्पर्धेत २०१६-१७ मध्ये कास्यपदक मिळविले आहे. कल्याण खडकपाडा येथील मोहनप्लनेट मधील मोहनसिंगसर, बोमार्शल आर्ट क्लासमधील संजय कतोड यांच्याकडे कीक बॉक्सिंगचे आद्ययावत प्रशिक्षण सुरु आहे. तसेच माझ्या या खेळासाठी आजोबा, आई, वडील यांच्यासह प्रल्हाद म्हात्रे यांचा प्रत्यक्ष पाठींबा असल्याचे अक्षय सांगतो. तर प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले कि, तो मेहनती असून त्यांनी त्याला झेपेल तेवढे प्रयत्न करावे. पण असे असले तरी आमच्या डोंबिवलीतील हा काजवा नक्कीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुर्यासारखा प्रकाशमान होईल. अक्षयने कीक बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपली शारीरिक क्षमता व आत्मविश्वास या जोरावर स्पर्धेत सहभागी व्हावे असा वडिलकीचा सल्लाही म्हात्रे यांनी दिला.