१२४ थॅलेसेमिया रुग्णांना प्लाझ्मा रिसर्च ट्रस्टने घेतले दत्तक

डोंबिवली : डोंबिवलीत गेले दोन दशकांपेक्षा जास्त काळ प्लाझ्मा रक्तपेढी रुग्णांना रक्त पुरवण्याचे काम करत असून या रक्तपेढीच्या विश्वस्त संस्थेने १२४ थॅलेसेमिया रुग्णांना दत्तक घेतले असून त्याना दर महिन्याला मोफत रक्त देण्याचे काम केले जात आहे.

या संदर्भात प्लाझ्मा रिसर्च ट्रस्टचे शैलेंद्र भागवत म्हणाले, डोंबिवलीतीलच नाही तर कल्याण, अंबरनाथ, बदलापुर, उल्हासनगर येथील रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी येत आहेत. या सर्व रुग्णांना आम्ही गरज असेल त्याप्रमाणे रक्त देण्याचे मोफत काम करत आहे. सहा महिन्याच्या बाळापासून ४२ वयापर्यतचे रुग्ण यामध्ये असून यातील काहीजण नोकरी करत आहेत. विशेष म्हणजे काही जणांचे पी.एच.डी. झाले असल्याचे त्यानी अधिक माहिती दिली. या सर्व रुग्णांना आम्ही दत्तक घेतले असल्याचे त्यानी सांगीतले. या सर्व रुग्णांना दरमहा रक्त द्यावे लागते याचा खर्च आम्ही ट्रस्टतर्फे करत असल्याचे त्यानी सांगीतले.

भागवत म्हणाले, ब्लडबँक सुरु केल्यावर रक्तासाठी हे रुग्ण प्रथम येऊ लागले. असे रोज होऊ लागले सुरवातीला आम्ही त्यांचेकडून पैसे घेत होतो. पण हे रुग्ण रोजच येऊ लागले तेव्हा असे वाटले की हे रुग्ण आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळे या रुग्णांना दत्तक घेण्याचा निर्णय आम्ही धेतला. या रुग्णाला एक बाटली रक्त देण्यासाठी सुमारे २५०० रुपये खर्च येत असल्याचे त्यानी सांगीतले व हा खर्च आमच्या ट्रस्टमार्फत होत असल्याचे त्यांनी सांगितले.