राजकिय क्षितीजावरील ग्रामीण तेजस्वी नेतृत्व म्हणजे डॉ. वंडार पाटील

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील समाविष्ट त्या 27 गावातील ग्रामीण विभागाचे राष्ट्रवादीचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. वंडार पुंडलिक पाटील यांचा वाढदिवस सोहळा मंगळवार दि. 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. वाढदिवस सोहळ्याचे आयोजन युवक अध्यक्ष सुधीर पाटील आणि किरण शिखडे यांच्या माध्यमातून होणार असून सोहळ्यात विविधलक्ष्यी विद्यालयाच्या शिक्षकवृदांचा मोठ्या संख्येने सहभाग असणार आहे.

देशात तसेच राज्यात महागाईची समस्या सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत असून नैसर्गिक आपत्तीची झळही गोरगरीबांना जगणे कठीण करीत आहे. आणि यामुळेच वाढदिवस सोहळा थाटामाटात साजरा करणे डॉ. वंडार पाटील यांना अपेक्षित नसतानांही समाजासाठी नेहमीच झटणाऱ्या लोकनेते डॉ. वंडार पाटील यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून कल्याण-डोंबिवलीतील शिक्षकांचा गौरव सत्कारमूर्ती डॉ. पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

राष्ट्रीय कॉंग्रेस सेवादलाच्या मुशीत 1982 सालापासून घडलेल्या सेवाव्रती डॉ. वंडार पाटील यांनी राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एका सामान्य शेतकऱ्याचा पुत्र असलेल्या पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पदार्पण केले आणि 1994 रोजी प्रथम उपसभापती म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग तीन वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून कार्यरत राहिले. सभापती पदावर असतांना विविध प्रकारची विकास कामे पूर्ण करून कृषी उत्पन्न बाजार समितीला वैभव प्राप्त करून देत सुमारे चार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. आणि त्यामुळेच मागील वर्षी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून इतिहास झाला आणि हे सर्व पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळे झाल्याचे बोलले जात होते. विशेष म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता पाटील यांनी समाजासाठी अफाट साहस दाखविल्यामुळे याची दखल राज्य शासनाने घेऊन सन 1984 रोजी राष्ट्रपती जीवनसुरक्षा पुरस्कार देऊन गौरविले होते.

तळागाळातील माणसे ज्ञानामृत सेवन करून सज्ञानी होऊन जीवन प्रवाहाशी जोडली जावीत या विचाराने पाटील यांनी 1983-84 रोजी कै. पार्वतीबाई पुंडलिक पाटील शिक्षण मंडळाची स्थापना केली. त्यानंतर विविधलक्ष्यी विद्यालय गोळवली हे माध्यमिक विद्यालय, लहू बालक विद्यामंदिर गोळवली हे प्राथमिक विद्यालय आणि कल्याण मधील सापाड येथे माध्यमिक विद्यालय सापाड आदी शैक्षणिक संस्थामधून विद्यार्थी शिक्षण घेत असून ते पुढे देशाचे भावी सुजाण नागरिक होणार आहेत. विविधलक्ष्यी विद्यालय गोळवली येथील शिक्षकवृंद तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस वतीने डॉ. वंडार पाटील यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.