डोंबिवली : शिक्षक व विद्यार्थी यांच्या अतूट नात्याचे महत्व ओळखून एका आगळ्या वेगळ्या प्रकल्पाचे आयोजन आहे. हा प्रकल्प म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्जल भविष्यासाठी झटणाऱ्या शिक्षकवृद्धांची ती एक सुंदर परिक्षाच. अशा या महत्वपूर्ण परीक्षेत यशस्वी ठरलेल्या पुरस्कार प्राप्त गुरुवर्यांचा यथोचित सन्मान इनरव्हील तर्फे ‘एनबीए’ पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येत आहे असे प्रतिपादन इनरव्हिलच्या माजी जिल्हाध्यक्षा व जिल्हा लिटरसी अध्यक्षा शुभा छापवाले यांनी केले.
पूर्वेकडील हॉटेल मॉडर्न प्राइड हॉल मध्ये पार पडलेल्या इनरव्हिल कल्ब आँफ डोंबिवली ईस्टच्या ‘नेशन बिल्डर अॅवार्ड’ वितरण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर इनरव्हिलच्या माजी जिल्हाध्यक्षा व जिल्हा लिटरसी अध्यक्षा शुभा छापवाले, समिती अध्यक्षा जयश्री तांबट, उपाध्यक्ष लता म्हैसपूरकर, सचिव विजया नांद्रे, प्रकल्प प्रमुख उज्वला देवधर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ‘एनबीए’ पुरस्कार प्राप्त शिक्षकांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देवून सन्माननीत करण्यात आले.
यावेळी छापवाले पुढे म्हणाल्या, इनरव्हिल तर्फे विविध सेवाभावी व शैक्षणिक उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येते. गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक मदत करून भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम इनरव्हिल करीत आहे. मुंबई मधील आशाकिरण ही संस्था रस्त्यावरील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत आहे. तेथील 17 मुलांची जबाबदारी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्वने घेतली आहे ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी प्रकल्प प्रमुख उज्वला देवधर यांनी सांगितले कि, शहरातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, शासन अनुदानीत व खाजगी शाळा अशा 16 शाळातील 160 मुलांना प्रश्नावली देण्यात आली होती. मुलानी प्रश्नावलीच्या माध्यमातून आपापल्या शाळेतील 16 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड केली ही महत्वाची गोष्ट आहे.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन, ईशस्तवनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्षा अंजली खिस्ती यांनी केले. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमास शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.