ग्राहकांनो प्लास्टिकच्या पिशव्या मागू नका, डोंबिवलीत फेरीवाल्यांचा अनोखा उपक्रम !

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशवी बंदीसाठी विविध योजना आणि उपक्रमांचे आवाहन नागरिकांना केले. यासाठी दुकानदार आणि फेरीवाले यांना यामध्ये समाविष्ट करून घेतले. काही फेरीवाल्यांवर आणि दुकांदारांवर कारवाईही केली. मात्र आता प्लास्टिक पिशव्या नकोत या विषयी खुद्द फेरीवाल्यांमध्ये जागरूकता आली असून आता फेरीवाल्यांनीच प्लास्टिक पिशवी बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. फेरीवाले आता प्लास्टिक पिशवी मागू नका असा फलक आपल्याजवळ ठेवत आहेत. डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे प्लास्टिक पिशवी बंदीला नक्कीच चालना मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

पश्चिम डोंबिवली येथील घनश्याम गुप्ते मार्गावर रेल्वे स्टेशनपासून सुमारे दीडशे मीटर दूरवर बसणाऱ्या फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय करतांना कृपया प्लास्टिक पिशवी मागू नका असा फलक जवळ बाळगला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा शेकडोच्या ससंख्येने फेरीवाले आपला व्यवसाय करतात. यामध्ये भाजी, फळे, खेळणी, घरगुती सामान, रेडिमेड कपडे, मोबाईल सामान, छत्र्या, महिलांची आभूषणे आदी वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. आणि अशा सामानांची खरेदी करतांना ग्राहक प्लास्टिक पिशव्यांची मागणी करत असत आणि फेरीवाले ती मागणी पूर्ण करीत होते. मात्र अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्लास्टिक वापराने आरोग्य तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे स्पष्ट झाले आणि परिणामी प्लास्टिक बंद चा पर्याय समोर आला. पालिका प्रशासनाने यावर कडक कारवाई करून प्लास्टिक पिशवी बंद धोरण कायम केले. यासाठी पालिका प्रशासनाने दंड आणि इतर कारवाई करीत या विषय लाऊन धरला त्याला प्रतिसाद मिळत असून नागरिकही आता प्लास्टिक पिशवी नको या विचाराने पुढे येत आहेत.

विशेष म्हणजे आता फेरीवालेही या कार्यात सहभागी होत आहेत. याबाबत डोंबिबली पश्चिम गुप्ते रोडवरील फेरीवाले आणि कष्टकरी हॉकर्स युनियनचे सदस्य राजू गुप्ता आणि अभय दुबे यांनी यासाठी पुढाकार घेतला
असून गेले दोन दिवस हे फेरीवाले ग्राहकानो प्लास्टिक पिशवी मागू नका असे फलक लावून व्यवसाय करीत असून त्यांना सर्व फेरीवाल्यांची साथ मिळाली आहे. तसेच जे ग्राहक पाच किलोच्या वर समान घेतील त्यांना स्वस्त भावात कापडी पिशवी देण्यात येईल असाही या फेरीवाल्यांचा उपक्रम आहे. त्याच्या या योजनेला पालिकेच्या “ह” प्रभागक्षेत्रातील अधिकारी विजय भोईर यांचे सहकार मिळत आहे असे फेरीवाले सांगतात.