श्री मारू कुमावत समाज सेवा ट्रस्टतर्फे मान्यवरांचा गौरव

डोंबिवली : येथील मारू कुमावत समाज सेवा ट्रस्ट माध्यमातून चातुर्मास प्रारंभाचे औचित्य साधून पाचवा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्वेकडील दावडी विभागातील पाटीदार सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सेवा समितीचे अध्यक्ष चुनीलाल जवानजी गुजर, बाबुलाल विराजी गुंगामण, मोहनलाल टिमाजी मेवाडा, सोहनलाल नाराजी रोटांगण, गोविन्दराम अमराजी तलैसा, पुखराज सुजाजी रामीणां, हिरालाल मगाजी सुंदवेशा, सोहनलाल इदाजी मेडतीया, वरदाराम तेजाजी चांदोरा आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष चुनीलाल गुजर म्हणाले, समाज एकत्रित येऊन काही समाजाप्रती ठोस कार्य करण्यासाठी अशा कार्यक्रमाची योजना असते. याद्वारे सर्वांची ओळख होऊन जवळीकता राखली जाते. अशा कार्यक्रमातून समाजातील मान्यवरांची ओळख होते. ज्या शहरात उद्योग, व्यवसाय करतो त्या शहरासाठी सत्कर्म करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे या माध्यमातून सर्वांसमोर मांडण्यात येते असेही चुनीलाल गुजर यांनी उपस्थित समाजासमोर मांडले.यावेळी समाजाप्रती केलेल्या बहुमूल्य कार्याबद्दल विशेष योगदान केलेल्या मान्यवरांचा गौरव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. समाजातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे पुढील वर्षाच्या महाआरतीसाठी बोली व चढाव मोठा रंगतदार झाला. समाजाच्या कार्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकजण या बोली-चढाव कार्यात सहभागी झाले होते. माताजीची महाआरती, दिप प्रज्वलन, महाप्रसाद कार्यक्रम आणि स्नेहसंमेलन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.