डोंबिवली : पावसाळी मोसमात विविध साथीच्या आजारांमुळे सामान्य गोरगरीबांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही लोकांना डॉक्टरांचा आर्थिक भार पेलवता येत नाही. अशा लोकांच्या आरोग्यासाठी माजी नगरसेवक संजय पावशे यांनी शिवसेना शाखा क्रमांक 65 कोपर तर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र, कै. लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था (रजि.) आदींचे बहुमूल्य सहकार्य लाभले. रविवारी सकाळी या मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन माजी नगरसेवक संजय पावशे, शाखा संघटक अपर्णा पावशे, निलेश सांबरे, अजित जाधव, चंद्रकांत पावशे, तानाजी बुद्रक यांच्यासह पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. तसेच या ठिकाणी लोकांनी शारीरिक जनरल तपासणी करून घेतली. यामध्ये ई.सी.जी. तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे मधुमेह रुग्णांना रक्तशर्करा, रक्तदाब, वजन, उंची आदी चाचणीसह, सर्दी, ताप, खोकला आदी सीझनल आरोग्यासाठी कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आले. याशिवाय 15 ऑगस्ट म्हणून नागरिकांना झेंडा वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त आधारकार्डमधील दुरुस्ती व नवीन आधारकार्ड शिबीर घेण्यात आले होते. या आधारकार्ड शिबीराचा फायदा मोठ्या प्रमाणात लहानमुलांच्या आधारकार्डसाठी झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.