डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात आरोग्य सुविधांची कमतरता !

( रुग्णालयात पोलिस चौकीची गरज )

डोंबिवली : कळवा येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलयात घडलेल्या घटनेने कल्याण-डोंबिवली पालिका रुग्णालयाच्या अवस्थेबाबतचे प्रश्न पुन्हा चर्चेत येत आहेत. पूर्वी छानपैकी रंगरंगोटी, साफसफाई, उत्तम बेड व्यवस्था अशी सुविधा असणाऱ्या या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात आरोग्य सुविधांची आजही कमतरता असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर्स  परिचारिका, कर्मचारीवर्ग आपल्यापरीने रुग्णसेवा देत असले तरी ती व्यवस्था पुरेशी नाही अशी तक्रार नागरिक करीत आहेत. या रुग्णालयात फक्त बाह्यरुग्ण तपासणी, प्रसूतिगृह, नेत्रतपासणी, बाळांची तपासणी, कान नाक घसा तपासणी, दंत तपासणी अशा तुटपुंज्या सुविधा मिळत आहेत. मात्र असे असले तरी रुग्णलयात काही बाहेरील लोकांकडून डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो यातून सुटका करण्यासाठी रुग्णालयात पोलीस चौकी असावी अशी मागणी होत आहे.

अपुऱ्या सुविधांचे पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय असा ठपका पुसण्यात आजवर सत्ताधारी तसेच प्रशासनाला यश आले नाही. परंतु या रुग्णालयातील आरोग्यसेवेसाठी येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी वर्ग प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात.मुख्य म्हणजे कळवा येथील रुग्णालय लांब असल्याने दिवा विभागातील गरीब रुग्ण डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात येत असतात. डोंबिवली, कल्याण आणि २७ गावातील रुग्णांची या रुग्णालयात वाढती संख्या पाहता सर्व उपचार होणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नाही. वाढीव पगार असतांना डॉक्टरांनी पाठ दाखविल्याने आता काय ? हा सत्ताधारी व प्रशासनाला पडलेला प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. बर्न वॉर्ड, लहान मुलांसाठी आवश्यक उपचार पेटी, अतिदक्षता विभाग, काचबिंदू, मोतीबिंदूचे ऑपरेशन, सिजर यांसारख्या सुविधा पालिकेच्या रुग्णालयात बंद आहेत. बाहेरील औषध सुचविणे हा प्रश्न रूग्णांना पडत असतो. सर्पदंश, रेबीज इंजेक्शन व इतर औषधे रुग्णालयात उपलब्ध असतात असे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. परंतु अतिदक्षता विभाग नसल्याने तसेच
बालरोगतज्ञ 4, भुलतज्ञ 3, फिजिशीयन 3, स्त्रिरोगतज्ञ 3, नेत्ररोगतज्ञ 2, कान नाक घसा तज्ञ 2, जनरल सर्जन 2, त्वचारोग तज्ञ 1, मनोरोगतज्ञ 1 डॉक्टरांची अधिक आवश्यकता असल्याचे पत्र वेळोवेळी पालिका प्रशासनाला मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. जर याबाबतची पदे डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात भरली तरच काहीतरी सुविधा गोरगरीब जनतेला मिळेल.
याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले की, अत्याधुनिक सुविधांची गरज आहे. सध्या आमचे कर्मचारी व डॉक्टर मेहनतीने लोकांच्या गरजा व रुग्णांची सेवा करीत आहेत. आमच्या येथे दिवसाला साधारण 5-6 सीझर प्रसूती होत असते. त्वचा, डोळे, दंत चिकित्सासाठी रुग्ण येत असून रुग्णालयात प्रतिदिन सुमारे एक हजार रुग्ण सेवेसाठी येत असतात पण यासाठी वेगळी पोलीस सुरक्षेची व्यवस्था मिळाली तर बरे होईल.