डोंबिवली पश्चिमेत भव्य आगरी आणि कोकणी महोत्सव जत्रा !

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर माध्यमातून उप शहराध्यक्ष तथा आयोजक प्रेमराज देविदास पाटील यांनी भव्य आगरी आणि कोकणी महोत्सव जत्रा आयोजित केली. पश्चिमेला उमेशनगर पोस्ट ऑफिस समोरील भव्य पटांगणात या जत्रेत मौज, मजा, मस्ती आणी धम्माल बालगोपाळ तसेच खवय्यांना मोठी संधी मिळाली आहे. शुक्रवारी मनसे शहराध्यक्ष राहुल कामत, जेष्ठ नगरसेवक प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर यांनी फित कापून जत्रेचा शुभारंभ केला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. या जत्रेत मुख्यत्वे लहानमुलांसाठी आकाशपाळणे आणि साहसीखेळ लक्षवेधी ठरत आहेत.

भव्य आगरी आणि कोकणी महोत्सव जत्रेत बचत गटातील महिलांच्या उत्पादनाची विक्री होण्यासाठी आयोजकांनी अफाट प्रयत्न केले आहेत. घरगुती वापरात लागणारे पदार्थांचे स्टॉल बचतगटांच्या महिलांनी थाटले आहेत. याशिवय महिलांच्या सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी असून याचेही उत्पादन महिला बचतगटांनी केल्याचे दिसत आहे. महिला सक्षम झाल्या पाहिजेत, स्वयंरोजगारासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे तो आम्ही जत्रेच्या माध्यमातून करीत आहोत असे प्रेमराज अभिमानाने सांगतात. या जत्रेत मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. याच व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक कलाकार उजेडात आले आहेत. १५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान अनेक मान्यवर जत्रा महोत्सवाला भेट देणार आहेत. मनसे आमदार राजू पाटील हे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संपताच भेट देणार आहेत. महोत्सवात जादूचे प्रयोग, डबलबारी भजन, दशावतार, महाराष्ट्राची लोकधारा, मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम, नृत्य आविष्कार अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी महिलांसाठी खास आकर्षण म्हणून लकी ड्रा माध्यमातून एक पैठणी भेट देण्यात येणार आहे. भव्य आगरी आणि कोकणी महोत्सव जत्रेत सर्वांसाठी सर्वकाही असून प्रवेश विनामूल्य आहे.