डोंबिवली स्टेशन परिसरात ‘जय श्री राम’ कंदील, मंदिर दिव्याने लखलखणार !

डोंबिवली : अयोध्येला २२ तारखेला प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. हा उत्सव साजरा होणार असुन डोंबिवलीतील मंदिरात लक्ष लक्ष दिव्याने लखलखणार आहेत. भाजप नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेवक मनीषा धात्रक यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन परिसरात ‘ जय श्री राम’ कंदील लावण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक रस्त्यावर हे भव्यदिव्य कंदील लक्षवेधी आहेत.

डोंबिवली पश्चिमेला एव्हरेस्ट प्रभागात, दीनदयाळ रोड व सम्राट चौक, महात्मा फुले रोड, महात्मा गांधी रोड, गुप्ते रोड अशा प्रत्येक रोडवर भव्यदिव्य  ‘जय श्री राम’ कंदील लावण्यात आले आहेत. परिसरातील प्रत्येक मंदिराची साफसफाई व रंगरंगोटी सुरू असून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. २२ तारखेला भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक व मनीषा धात्रक हे मंदिरात श्री रामाचे दर्शन घेऊन आरती करणार आहेत. याबाबत शैलेश धात्रक म्हणाले, २२ तारखेला देशभर प्रभू श्रीरामांचा उत्सव साजरा होणार आहे. तसाच मोठ्या उत्साहात डोंबिवलीतील मंदिरात रोषणाई व दीपोत्सव होणार आहे. शहरातील प्रत्येक नागरिक ‘जय श्री राम’ म्हणत सहभागी होणार आहेत.