डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी अयोध्या श्रीराम मंदिर रथाच्या प्रतिकृतीची उभारणी केली आहे. कल्याण लोकसभा परिक्षेत्रात या भव्य रथाची मिरवणूक मोठ्या जयघोषात बुधवारी सकाळी निघाली. डोंबिवली पश्चिम येथील पु बा भावे सभागृहापासून अयोध्या राम मंदिर रथयात्रेला प्रारंभ झाला. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी श्रीराम रथाचे मनोभावे पूजन केले. यावेळी फुलांची उधळण करीत जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, माजी महापौर विनिता राणे, जेष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, जनार्दन म्हात्रे, रवी पाटील, रणजित जोशी, संजय पावसे, कविता म्हात्रे, संतोष चव्हाण, दिनेश शिवलकर, संदेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने राम रथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. पश्चिम येथील पु बा भावे सभागृहापासून सुरु झालेल्या रथयात्राची संपुर्ण डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. डोंबिवलीकर मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.