संथगतीने होत असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाकडे लक्ष द्यावे !

( माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचे पालिका आयुक्तांशी साधला संवाद )

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत डोंबिवली विभागीय पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 49 राजू नगर परिसरातील सुभाष रोड ते कुंभार खानपाडा दरम्यान दीडशे फूट रिंग रोडपर्यंत डीपी रस्ता आणि प्रभाग क्रमांक 50 गरीबाचा वाडा येथे महात्मा फुले रोड श्रीधर म्हात्रे चौक ते दीडशे फूट रिंग रोड पर्यंत डीपी रस्त्याचे कॉंक्रिटिकरणचे काम एम एम आर डी ए माध्यमातून चालू आहे. परंतु सदर डीपी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम संथ गतीने होत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

सततच्या दमदार पडणाऱ्या पावसाने सद्यस्थितीत रस्ते खड्डेमय होत असून याचा नागरिकांना प्रचंड मनःस्तापला सामोरे जावे लागत आहे. परिणामी भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी याबाबतीत बुधवारी पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांना निवेदन दिले. यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मक चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याच्या आश्वासन दिले आहे.

या विभागातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या तसेच वाहनचालक यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता कॉंक्रिटिकरण होणे या कामासाठी लोकं सहकार्य करीत असतांना त्यांच्या त्रासाचा विचार झाला पाहिजे असे म्हात्रे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच प्रभागातील आवश्यक विविध कामांबद्दल त्यांनी आयुक्तांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे कुंभारखान पाडा येथील स्मशानभूमीविषयी असणारी समस्या मार्गी लावावी. पश्चिम विभागातील लोकांना पूर्वेकडील स्मशानभूमीवर अवलंबून राहावे लागत आहे. पालिकेच्या माध्यमातून या विषयी लागणाऱ्या लाकडे विषयीचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा असेही सूचित केले.