डोंबिवलीत स्वामींच्या घरात वर्धापनदिन निमित्ताने विविध उपक्रम

डोंबिवली : स्वामींच्या घराच्या पाचव्या वर्धापनदिन निमित्ताने सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापनदिनानिमित्त पर्यावरणाचा संदेश देणारी सुंदर बाग सुशोभित करण्यात आली. झाडे लावा झाडे जगवा या प्रकल्पा अंतर्गत अपर्णा संगोराम यांच्या सहकार्याने कै.श्रीनिवास संगोराम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या बागेच्या नामफलकाचे उद्घाटन स्वामींच्या घराच्या विश्वस्त संचालिका माधवी सरखोत यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वामींच्या घरात सातत्याने चालणाऱ्या सामाजिक, वैद्यकीय, वैचारीक तसेच धार्मिक व प्रबोधनात्मक उपक्रमाच्या कार्य‌अहवालाचे प्रकाशन मुलाखतकार व लेखिका मीना गोडखिंडी यांच्या हस्ते झाले. यावेळी माधवी सरखोत यांनी स्वामींच्या घराच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

स्वामींच्या घरात प्रतिदिन २५० ते ३०० गरजू लोकांना मोफत अन्नदान होत असते. समर्थ व्याख्यानमालेच्या माध्यमातून दर महिन्याला वैचारिक व प्रबोधनात्मक व्याख्याने, आदिवासी पाड्यावर दिवाळी फराळ वाटप आणि त्यांच्याच बरोबर दिवाळी सण साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे महिला दिन म्हणून तळागाळातील श्रमिक महिलांना साडी वाटप केले जाते.

महिलांनी स्वयंसिद्ध असावे म्हणून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रम असतो. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान, दंतचिकीत्सा तसेच नेत्र तपासणी अशी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाते. योगाभ्यास, गीतापठण, समर्थ संगीत सेवा आणि सर्व नैमित्तिक व धार्मिक उत्सवाचे आयोजन स्वामींच्या घरात नियमितपणे केले जाते. स्वामींच्या घराचा आगामी उपक्रम म्हणजे वेदपाठशाळा आणि धार्मिक व वैचारिक ग्रंथांचे सुसज्ज ग्रंथालय यांची आखणी सुरू आहे अशी माहिती विश्वस्त संचालिका माधवी सरखोत यांनी दिली