(मनसे नेता अविनाश जाधव तसेच आमदार राजेश मोरे यांनी दिला आधार)
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असेल तर तो न्याय मला मान्य आहे. पण एकट्या मराठी मुलीवर अन्याय का केला जातो असा रोखठोक सवाल मराठी तरुणी एकता सावंत हिने सर्व पुढाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे. यामुळे ताबडतोब ठाण्यातील मनसे नेता अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत धाव घेऊन त्या मराठी मुलीला आधार दिला. या घटनेची चर्चा सर्वदूर पसरताच मराठी प्रियजन जागे झाले असून सर्वांनी त्या तरुणीला धीर दिला आहे. शिवसेना कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनीही तिला फोन करून शिवसेना पाठीशी राहील. आमचा महिला मोर्चा तुझ्याबरोबर आहे काळजी करू नकोस असे सांगून आधार दिला आहे. अशाप्रकारे एका रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या मुलीच्या पाठीशी सर्व येत असल्याने शहरात ही घटना लक्षवेधी ठरली आहे.

शहरात अनधिकृत फेरीवाला प्रश्न नेहमीच अग्रक्रमावर असून पालिका दररोज कारवाई करत असते. परंतु काहीवेळा अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा फेरीवाले रस्ता ब्लॉक करतात ही पूर्वेकडील स्टेशन जवळील परिस्थिटी असल्याचे नागरिक सांगत आहेत. पण आता या घटनेमुळे फेरीवाला विषय आणि मराठीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. कारण या तरुणीने इंस्टाग्रामवर या विषयाची पोस्ट करत आपली कैफियत मांडली आणि मनसेने याची दखल घेतली.
डोंबिवलीत एक मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते. मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती. इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना पालिका अधिकारी पाठीशी घालत असल्याचा दावा या मराठी तरुणीने केला आहे. परिणामी इंस्टाग्राम पोस्टची दखल राज ठाकरे यांनी घेतल्याने मनसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे डोंबिवलीत आले आणि याविषयी माहिती घेतली आणि तिला व्यवसाय विषयी आधार दिला. पालिका आयुक्तांशी हा विषय मांडून योग्य तो न्याय देऊ असेही सांगितले.
तर याविषयी कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी स्वतः त्या तरुणीला फोन करून तू काळजी करू नकोस तुला योग्य तो न्याय मिळेल. शिवसेना तुझ्या पाठीशी आहे. योग्यप्रकारे व्यवसाय करणाऱ्या तरुणीच्या बरोबर आमचा महिला मोर्चा कायम पाठीशी राहील असेही मोरे यांनी तिला सांगीतले.
