कडोंमपा महापौरपदी हर्षाली थविल तर उपमहापौर पदी राहुल दामले

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत महापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले हे बिनविरोध निवडून आले आहेत. महापौर व उपमहापौर पद निवडणुकीसाठी इतर कोणाचेही अर्ज दाखल न झाल्याने महापौर व उपमहापौर निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे जाहीर करण्यात आले.

महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या विशेष बैठकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी आचल गोयल उपस्थित होत्या. त्यांनी कडोंमपा महापौरपदी हर्षाली थविल तर उपमहापौर पदी राहुल दामले असतील असे घोषित केले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांची महापौर म्हणून नियुक्ती झाली. तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले हे बिनविरोध निवडून आले आहेत. हर्षाली थविल यांच्याविरोधात एकही अर्ज आला नाही, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तीच गोष्ट राहुल दामले यांच्याबबातही असल्याची बाब समोर आली. परिणामी अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर क.डों.म.पा साठी अखेर महापौर आणि उपमहापौर मिळाले आहेत.

नवनिर्वाचित महापौर हर्षाली थविल म्हणाल्या, सगळ्यांचे सहकार्य आणि जनतेच्या विश्वासामुळे हा पदभार सांभाळणार आहे. तर उपमहापौर राहुल दामले म्हणाले, युतीमध्येच निवडणूक लढविल्याने एकत्रच सभागृहात आलो आणि एकत्रच आनंद साजरा करणार. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुःखद निधन झाल्यामुळे विजय मोठ्या उत्साहात साजरा करणार नाही. दोन्ही पक्षाकडून हा सोहळा शांततेत साजरा करणार असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान सभागृहात भाजप शिवसेना पक्षाचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. सर्वजण फेटे बांधून मराठी पारंपारिक पद्धतीने सभागृहात आले होते. परंतु विशेष म्हणजे महापौर उपमहापौर निवडणुक दरम्यान उबाठा गटाचे नगरसेवक सभागृहात उपस्थित नव्हते नंतर मात्र ते सभागृहात आले. निवडणूक पार पडल्यावर उबाठाचे ८ नगरसेवक सभागृहात आले.

महापौरपदी हर्षाली थविल तर उपमहापौर पदी राहुल दामले यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकत कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.