डोंबिवली : पूर्वेकडील पी अँड टी कॉलनी मधील होली एंजल्स शाळा व ज्युनिअर कॉलेजचा छत्तीसावा स्नेहसंमेलन कार्यक्रम रविवारी शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमास शाळेचे संचालक डॉ. ओमन डेव्हिड, प्राचार्य बीजॉय ओमन, विश्वस्त लीला ओमन, मुख्याध्यापिका नीतू शर्मा यांच्यासह आमंत्रित प्रमुख पाहुणे मंजुश्री पाटील व शायसन ओसेफ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर निमंत्रित प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय ऍनी बीजॉय यांनी करून दिला तर शाळेचे प्राचार्य बिजॉय यांनी शाळेविषयी समस्त पालक वर्गास उद्देशून भाषण करतांना सांगितले की, शंभर टक्के रिझल्ट व शाळेतील मुलांना ज्ञानाबरोबरच अनेक कलागुणांना वाव देणे व देशासाठी एक उत्तम माणूस व उत्तम नागरिक तयार करणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी शाळेचे संचालक मंडळ, शिक्षक व पालक यांचे सामूहिक योगदान महत्वाचे असते असे स्पष्ट केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका नीतू शर्मा यांनी शाळेचा वार्षिक अहवाल पालकांपुढे सादर केला. त्यानंतर कॉर्डिनेटर शिवकुमार यांनी नव्याने सुरू झालेल्या डिग्री कॉलेज विषयी माहिती दिली.
दरम्यान शैक्षणिक आणि खेळात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे मंजुश्री पाटील व शायसन ओसेफ, डॉ.ओमेन डेव्हिड, लिला ओमेन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, रोख प्राईज आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या दोन दिवसीय वार्षिक उत्सवात विद्यार्थ्यांनी आपापल्या कला सादर केल्या. शाळेच्या या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
