डोंबिवलीत महिलांच्या कलाकृतीचे प्रदर्शन

( प्रदर्शन पाहण्याकरता गर्दी )

डोंबिवली : डोंबिवली व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी छंद म्हणून जोपासलेल्या दर्जेदार कलाकृतींना कलाक्षेत्रात वाव मिळावा तसेच त्यांच्या कलाकृतींतून सामाजिक कार्यास हातभार लाभावा या हेतूने दीपकला फाऊंडेशन आणि डोंबिवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सहकार्याने वुमेन्स आर्ट फेअर – आर्ट फॉर चॅरिटी चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन आनंद बालभवन येथे भरविण्यात आले असून सर्वांसाठी खुले आहे.

सदर प्रदर्शनाचे उद्घाटन अनिमेशन क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले प्रसिद्ध आणि डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे, प्रसिद्ध कलाकार प्राची किल्लेकर, चंद्रशेखर संत, निवृत्त मुख्याध्यापिका दीपाली काळे, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी या प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले असून प्रदर्शनाचे आयोजक दीपक जाधव आहेत.

प्रथमच अशा प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सदर प्रदर्शनामध्ये डोंबिवली व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी छंद म्हणून जोपासलेल्या चित्रकला, शिल्पकला, रेझिन आर्ट, मंडला आर्ट, मधुबनी आर्ट, सिरेमिक आर्ट, मोजेक आर्ट, पारंपारिक कला, हस्तकला इत्यादी अनेक कलाकृतींचा समावेश करण्यात आला असून कलेचा अनोखा संगम पहायला मिळेल.

यावेळी कलाकार प्राची किल्लेकर म्हणाल्या, स्त्रीवर खूप जबाबदारी असतात. महिलांनी कला जोपासली पाहिजे. कलेचा महत्वाचा पाया हा निरीक्षण असते. चंद्रशेखर संत म्हणाल्या, कलेबाबत एकाग्रता महत्वाची, मन लावून काम करणे हे कलाकाराचे ध्येय असते.