( नगरसेविका रसिका पाटील यांच्या मागणीला यश )
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक २३ मधील विविध प्रलंबित नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे गटनेते शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली थविल-चौधरी आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीनंतर महापौर, आयुक्तांसमवेत नागरी समस्यांवर संयुक्त पाहणी दौरा होणार होणार असल्याने नगरसेविका रसिका पाटील यांच्या मागणीला यश आले आहे.

भाजपा महापालिका गटनेते शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महापौर, आयुक्त, नगरसेविका रसिका पाटील आणि भाजप वरिष्ठ पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत जुनी डोंबिवली अंडर बायपास येथे नवीन आरसीसी बॉक्स नाला उभारण्याचा प्रस्ताव, भीमाश्रय इमारतीजवळील पाणीगळतीची समस्या, कमी दाबाने व अल्प कालावधीसाठी होणारा पाणीपुरवठा तसेच प्रभागातील कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. तसेच संबंधित प्रश्नांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महापौर, महापालिका आयुक्त, उपमहापौर तसेच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
मुख्य म्हणजे जुनी डोंबिवली अंडर बायपास परिसरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करून नवीन आरसीसी बॉक्स नाल्याचे नियोजन तसेच संपूर्ण अंडर बायपास रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या बैठकीत प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन नागरी समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेविका रसिका कृष्णा पाटील यांनी बैठकीत नागरिकांच्या विविध समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली त्या मागणीला अखेर यश आल्याने आता प्रभागातील समस्या सुटण्याची दाट शकतात असल्याची चर्चा होत आहे.
