( नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांच्या पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद )
डोंबिवली : ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी नगरसेवक मुकुंद (विश्यू) पेडणेकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या शिबिरात वय वंदन कार्ड, एसटी बस सवलतीसाठी स्मार्ट कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड अशा तीन महत्त्वाच्या कार्डांच्या वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आवश्यक असलेल्या कार्डाबाबत मार्गदर्शन करून अर्ज प्रक्रिया तसेच कार्ड मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांकडून सहकार्य करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड महत्त्वाचे असून वय वंदन कार्ड आणि आयुष्मान भारत कार्डच्या माध्यमातूनही विविध शासकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमासाठी नगरसेवक विश्यू पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड अध्यक्ष संतोष देसाई, शहर सचिव अमित जिळटेकर, राजू खेंगरे यांच्यासह बूथप्रमुख आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. नागरिकांना विविध शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी जिल्हा पदाधिकारी संजीव बिडवाडकर यांनी सांगितले.
