डोंबिवली : एसटी प्रवासात सवलतीचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक २३ माध्यमातून पश्चिमकडील श्रीधर म्हात्रेवाडी येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शनिवारी एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आले. एसटी प्रवास सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरात एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी करण्यात आली. या नोंदणीनंतर १२ वर्षांवरील मुली व महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तर ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. नोंदणीसाठी आधार कार्ड आणि स्वाक्षरी आवश्यक आहे.
या उपक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक २३ शिवसेना नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती जनार्दन परशुराम म्हात्रे, समाजसेविका प्रियदर्शिनी कुंदन म्हात्रे आणि समाजसेवक अक्षय जनार्दन म्हात्रे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही सुरू राहतील. तर नगरसेविका रेखा म्हात्रे म्हणल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि जनार्दन परशुराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनातून हे एसटी कार्ड शिबिर आयोजित केले आहे. याचा फायदा एसटी प्रवास सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी नक्कीच होईल.
