कल्याण ग्रामीणमधील १८ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ

( आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन, विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध )

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तब्बल १८ अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी गजानन पाटील (तालुका प्रमुख), नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील, शैलजा भोईर, संगीता अनिल म्हात्रे, विजेशी दर्शन म्हात्रे, रविना अमर माळी, नगरसेवक अर्जुन पाटील, जालिंदर पाटील, प्रभाकर जाधव (माजी नगसेवक), नितीन नारायण माळी (विभाग प्रमुख), रोशन पाटील (शाखाप्रमुख) मा. सरपंच ‌ दत्ता वझे, मुकेश पाटील, सतीश मराठे, पांडुरंग वझे ,अभिमन्यू म्हात्रे अमित वझे, बालकृष्ण कापडी, अशोक ठाकुर, दत्ता म्हात्रे, योगेंद्र पासवान, राजकिरण राऊळ, प्रशांत शिंदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अंतर्गत पिसवली ते अडवली, दावडी, सोनारपाडा, ललित काटा ते सोनारपाडा तलाव, मानपाडा-पाचकूरा, मानपाडा-विठाईनगर, मानपाडा, सोनारपाडा स्मशानभूमी ते उंबार्ली दत्त मंदिर, उंबार्ली, आंतरली, हेदूटणे, निळजेपाडा, निळजे-कोळे, कोळे, काटई-कोळे (बागन), उसरघर, देसलेपाडा गोळेश्वर मंदिर तसेच भोपर येथील अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.

या १८ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या कामांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुलभ होणार असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांवरही कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीणच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात आणि परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागाचा विकास केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून सुरू आहे. अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत झाल्याने परिसरातील नागरी सुविधांना चालना मिळणार असून, ग्रामीण विभाग अधिक स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या १८ रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांच्या भूमिपूजनामुळे कल्याण ग्रामीणमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, लवकरच या विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ परिसरातील रहिवाशांना मिळणार आहे.