डोंबिवली, २६ (प्रतिनिधी) : शिवाई बालक मंदिर ट्रस्ट माध्यमांतून गेली सोळा वर्षे शिवाई आंतरशालेय वर्षा मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. शहरात क्रीडा संस्कृती रुजून तिचे संवर्धन होऊन त्यासाठी जिद्द निर्माण व्हावी हा संस्थेचा उद्देश होता.
यावर्षी सदर स्पर्धा रविवार दि. ३० जुलै रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत होणार आहे. या स्पर्धेत ८ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत मुला-मुलींचे आठ गट तयार करण्यात आले असून याशिवाय मतीमंद, गतिमंद आणि कर्णबधीर मुलांचे दोन गट असणार आहेत. या स्पर्धेत सुमारे सात हजार स्पर्धकांचा सहभाग असणार असल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम म्हात्रे महाराज क्रीडा संकुलात या वर्षा मिनी मॅरेथॉन-२०१७ चे उदघाटन होणार असून त्यानंतर त्याच ठिकाणी बक्षिस सोहळा होणार आहे. स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह द्वीगुणित करण्यासाठी डोंबिवलीकरांनी अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक शशिकांत ठोसर यांनी केली आहे.