डोंबिवली, दि. २४ (प्रतिनिधी) : संस्कार भारती डोंबिवली समिती माध्यमातून होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त कला शिक्षकांचे एकत्रीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात “आवड हेच करिअर” या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
पश्चिमेकडील रणाप्रताप भवन, स्वामी विवेकानंद विद्यामंदिरातील डॉ. हेगडेवार सभागृहात रविवार, दि. ३० जुलै, २०१७ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत “गुरुपौर्णिमा उत्सव” म्हणून कला शिक्षकांचा एकत्रीकरण सोहळा होणार आहे. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात “चित्रकला” विषयाला प्राधान्य देऊन उत्सव साजरा होणार आहे. या कार्यक्रमात पाच जेष्ठ चित्रकारांचा व त्यांच्या गुरूंचा सन्मान करण्यात येईल. या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार विजय आचरेकर हे तैलरंगतील व्यक्तीचित्रणाचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. तसेच ते “आवड हेच करिअर” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य म्हणजे कार्यक्रमात सर्व शाळांमधील चित्रकला विषयात विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सदर गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सोहळ्यात कला साधकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या मधुरा पुरोहित यांनी केले आहे.