भरधाव मोटारसायकल धडकीत तरुण जखमी

डोंबिवली, २७ (प्रतिनिधी) : पश्चिमकडील स्वामी विवेकानंद शाळेसमोरील  रस्त्यावर भरधाव मोटारसायकल चालविणाऱ्या मोटारसायकलस्वारामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला. हि घटना विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पश्चिम विभागातील गगनन स्मृती इमारतीतील मनीष भिडे हा तरुण पायी स्वामी शाळेच्या रस्त्यावरून जात असताना एमएच05/एएफ/9934 क्रमांकाची मोटारसायकल भरधाव वेगाने चालवत असताना त्याने समोरून तरुणाला धडक दिली. या घटनेत संजय भिडे हा तरुण जखमी झाला असून त्याच्या ओठाला, गळ्याला, उजव्या हाताला, खांद्याला मार लागला. मोटारस्वाराने त्या जखमी तरुणाला मदत न करताच पोबारा केला. शहरात सुसाट वेगाने गाड्या चालविण्याचे प्रकार वाढले असून पोलीस प्रशासन या गोष्टीकडे डोळेझाक करीत आहेत अशा तक्रारी नागरिक करीत आहेत.