अपूर्ण पदपथ आणि खड्डे विरोधात आंदोलन

डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : गणपतीच्या आगमनापूर्वी शहरातील खड्डेमय रस्त्यांची तातडीने युध्दपातळीवर दुरुस्ती करा आणि मानपाडा रोडवरील पदपथाचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करा अशा मागणीसाठी प्रतिकात्मक गणरायाची आरती करुन सर्वपक्षीय डोंबिवलीकर पदाधिकाऱ्यानी पालिका विभागीय कार्यालयासमोर आज संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन केले.

‘फूटपाथ फूटपाथ लवकर करा’ अशी मागणी करून आणि टाळ वाजऊन गणरायाची आरती करीत सदर आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेनेला खड्डेमय रस्ते दुरुस्तीच्या मागणीचा घरचा आहेर देण्यासाठी केलेल्या आंदोलनाला मनसे, राष्ट्वादीच्या तुरळक पदाधिकार्यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा होती. वेळोवेळी शिवसेनेच्याच पाधाधीकाऱ्याना अशी आंदोलने का करावी लागतात असे नागरिक आपसात बोलत होते. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकानी पालिका कार्यालयाच्या गेटवर आंदोलकांना अडविण्यात आल्यावर त्यांनी आपले निवेदन सेतु कार्यालयात दिले. त्यामुळे मोजक्याच पंधरावीस जणांनी केलेले हे आंदोलन अनोखे असले तरी प्रभावी ठरले नाही अशी चर्चा पालिका वर्तुळात होती.