धोकादायक इमारतीत डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय

डोंबिवली : १४३ डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय पश्चिमेतील भाषाप्रभु ज्येष्ठ साहित्यीक कै. पु. भा. भावे सांस्कृतिक केंद्राच्या जागेत गेली सात-आठ वर्षे आहे. डोंबिवली नगरपरिषदेने १९८० साली ही इमारत बांधली होती. ती इमारत आता जीर्ण झाली असून धोकादायक झाली आहे. इमारतीच्या छताच्या पिलरचे प्लॅस्टर दोन तीन ठिकाणी कोसळले असून जीन्यातील छताचे प्लास्टर पडल्याने आतील सळ्या बाहेर डोकावू लागल्या आहेत. भिंतीना मोठया प्रमाणावर वाळवी लागली असून अशा अवस्थेत कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत तर नागरिकही घाबरतच येत आहेत.

या धोकादायक इमारतीत तळ मजल्यावर विधानसभा मतदार संघ कार्यालय, पहिल्या मजल्यावर तलाठी कार्यालय तर दुसऱ्या मजल्यावर हिंदी शाळा आहे. या इमारतीच्या दुर्दशेबद्दल प्रसार माध्यमांनी अनेकदा आवाज उठवला आहे. ज्येष्ठ साहित्यीक पु. भा. भावे सांस्कृतिक केंद्राचे नाव शिल्लक असून येथे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. तळ मजल्यावरील सांस्कृतिक केंद्राच्या भिंतीवर डोंबिवली भूषण ज्येष्ठ साहित्यीक पु. भा. भावे यांचे छायाचित्र लावण्यात आले असून ती भिंत वाळवीने पोखरली आहे. शिवसेनेचे या भागाचे उपशहरप्रमुख संतोष चव्हाण यांनी या इमारतीचे नुतनीकरण करावे यासाठी वांरवार पाठपुरावा केला पण प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

१४३ विधानसभा मतदार संघाचे सात-आठ कर्मचारी व शेकडेा नागरिक येथे जीव मुठीत धरुन वावरत आहेत. डोबिवली विधानसभा मतदार संघाचे मतदार वाढत असताना कर्मचारी व जागाही अपुरी पडत आहे. त्यामुळे कार्यालय हलवण्याची मागणी कर्मचारी करत आहेत. उपशहरप्रमुख संतोष चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याकडे इमारतीचे नूतनीकरण करण्यात यावी यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. डोंबिवलीत गेल्या दोन-तीन महिन्यात दोन-तीन इमारती कोसळल्या असून प्रशासन याची वाट पहात आहे का एवढाच प्रश्न आहे.

डोंबिवली विधानसभा मतदार संघात १ लाख ७४ हजार ७१६ पुरुष तर १ लाख ६३ हजार ०७२ स्रिया असे मिळून ३ लाख ३७ हजार ७८८ मतदार आहेत. सध्या रंगीत फोटो जमा करण्याची मोहिम करण्यात येत असून ८०० फोटो रंगीत जमा झाले असून १०,९६५ ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो असून १ लाख ०८ हजार ५५ मतदारांचे फोटो नाहीत अशी माहिती डोंबिवली विधानसभा मतदात संघाचे अधिकारी एन. जी. पाटील यांनी सांगीतले.