डोंबिवली : मध्य रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकाची रडकथा नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. असुविधा असलेले रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक ओळखले जात आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे एकदाचे स्थानकात दोन एक्सिलेटर झाले. परंतु गेले तीन महिने डोंबिवली स्थानकाच्या पश्चिम बाजूकडील लिफ्टचे कामकाज पूर्ण होऊनही डोंबिवली रेल्वे प्रवाशांना लिफ्टची प्रतीक्षा करावी लागत आहे.
डोंबिवली हे रेल्वे स्थानक मुंबईकडे आणि कर्जत-कसाराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे गर्दीचे ठिकाण. कोणत्याही प्रकारची अडचण रेल्वे प्रवाश्यांना होऊ नये म्हणून अनेक सोयी-सुविधा रेल्वे प्रशासनाने देऊ केल्या. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. अत्याधुनिक डिलक्स टॉईयलेट अशी वल्गना होत असलेल्या टॉईयलेटची परिस्थिती वाईट आहे. जी दोन एक्सिलेटर आहेत ती बऱ्याच वेळा बंद पडलेली असतात. पण काही वेळा त्याचा फायदा प्रवाशांना होतो. पूर्वेकडील लिफ्टचा फायदा चांगल्या प्रकारे प्रवाशांना होत आहे. परंतु पश्चिमकडे अशी सुविधा नसल्याने जेष्ठ नागरिकांना खूपच त्रासदायक ठरत आहे.
पश्चिम बाजूकडील लिफ्टबाबत रेल्वे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 70 ते 80 लाख रुपये खर्च करून पश्चिमकडे लिफ्टचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले आहे. फक्त विद्युत आणि सिव्हील काम गेले दोन महिने रखडले आहे. क्लॅडिंग आणि रेलिंगसाठी काम अडले असल्याचे बोलले जात आहे. पश्चिमकडील लिफ्टला स्थानकांतून प्रवेश देण्यात आल्यामुले रेल्वे प्रवाशांव्यतिरिक्त कोणीही वापर करू शकणार नाही. तसेच रस्त्याच्या लेवलपासून खूप उंचावर असल्याने पावसाळ्यात लिफ्ट बंद पडणार नाही. तरीही लिफ्टच्या अवतीभोवती जे भरमसाट केबलचे जाळे आहे ते कोणाचे हा प्रश्न अनुत्तरीत आहेत. परंतु अशा लिफ्ट सारख्या चांगल्या सुविधा रेल्वे प्रवाशांना कधी मिळणार असे रेल्वे प्रवाशी विचारात आहेत.