शिक्षकदीना निमित्त अनोखा कार्यक्रम : शिक्षकांचा गुणगौरव व विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप

डोंबिवली : विध्यार्थांना शैक्षणिक क्षेत्रात शालेय साहित्याचा अभाव निर्माण होऊ नये हे उद्दिष्ट ठेऊन निर्माण झालेल्या प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्थेतर्फे शिक्षकदीनाचे औचित्य साधून एका अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेने शिक्षकांना आदर्श पुरस्कार आणि विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विशेष म्हणजे हा दुग्धशर्करा योग महापालिकेच्या हुतात्मा बाबू गेनू मराठी शाळेत जुळून आला.

खंबाळपाडा येथील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शाळा क्रमाक 70 येथील हुतात्मा बाबू गेनू मराठी शाळेत प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्थेतर्फे आदर्श पुरस्कार आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ‘ग’ प्रभाग समिती सभापती तथा नगरसेवक साई शेलार, माजी परिवहन सभापती गंगाराम शेलार, काशिनाथ फर्डे, राजेंद्र मेनन आदी मान्यवर उपस्थित होते,

यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश मोरे म्हणाले कि, संस्थेच्या उद्दिष्टानुसार शैक्षणिक क्षेत्रात काम सुरु आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळोवेळी पुरविण्याचे काम संस्था करीत आहे. या कार्यात अनके सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या मान्यवर व्यक्तींची साथ मिळत आहे. शैक्षणिक साहित्य व्यतिरिक्त सायकल वाटप, शिलाई मशीन, श्रवण यंत्रे, कापडी पिशव्या, अपंगांसाठी तीन चाकी सायकल, आश्रम शाळेतील विद्यार्थांना युनिफॉर्म आदी साहित्य देण्यात आले आहे. आजचा दिवस आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आज शिक्षकदीन असून गुरुवर्य शिक्षकांना आमच्याकडून प्रेमाची भेट देण्याची संधी मिळाली आहे. संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य हे गुरुवर्य करीत असल्याने त्या शिक्षकवृंदाना संस्थेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आम्ही गौरव करीत आहोत.

शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या खंबाळपाडा क्षेत्रातील शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणायत आला. गणेश रघुनाथ पाटील, मधुकर जाधव, नंदा गणेश पाटील, अशोक रामाराव बोरसे, शिवाजी रामदास पाटील, रमिलाबेन कांतीलाल पांचाळ, गणेश जगन्नाथ भानुशाली, पुष्कर राजीव देशपांडे आणि अरविंद मारुती गोलाईकर यांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, कंपॉसबॉक्स, वह्या-पेन-पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्ष्मण जाधव, गणेश पाटील, अरविंद बोलाईकर, दिनेश वैद्य, उमेश मोरे, प्रवीण दौंडी मंगेश बोरवडे आदींनी विशेष मेहनत घेतली.