डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने स्वच्छ-सुंदर पालिका असे सूत्र जाहीर करूनही पालिका परिसर कचरामुक्त फक्त कागदावरच आहे. डोंबिवली विभागीय पटांगणात भंगार आणि कचऱ्याचे साम्राज्य चर्चेचा विषय होत होता. परंतु काही समाजप्रेमींनी कचरामुक्तीसाठी पटांगणातील कचऱ्याचे फोटो आयुक्तांच्या व्हाटस अॅपवर टाकताच प्रशासन जागे झाले आणि भंगार हटविले गेले.
डोंबिवली विभागीय कार्यालयातील पटांगणात भंगार साचल्याने दूर्गंधी पसरली होती. परिणामी तेथील अधिकाऱ्यांना सांगूनही कचरा उचलला जात नव्हता. पालिकेच्या ध्वज स्तंभाच्या शेजारीस कचरा आणि भंगार याचे डंपिंग झाले होते. प्रभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे पालिका आयुक्त गोविंद बोडके व्हाटसअॅपवरील समस्यावर तत्काळ लक्ष देतात ही माहिती मिळाल्यामुळे आयुक्त बोडके यांच्या व्हाटसअॅप नंबर वर पालिका आवारातील भंगाराचे फोटो टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. या व्हायरल भंगार फोटोकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आयुक्तांनी भंगार हटविण्याचे आदेश दिले. परिणामी विभागीय कार्यालयातील पटांगणातील कचरा व भंगार जेसेपीच्या माध्यमातून तत्काळ हटविल्यामुळे पटांगण मोकळे झाले. कचरा व भंगार काढल्यामुळे दूर्गंधीही मुक्त झाली. व्हाटस अॅप इफेक्टमुळे जर अशी चांगली कामे होत असतील तर आता लाखो समस्या आयुक्तांना व्हाटसअॅपवर पाठवा अशी चर्चा पालिका वर्तुळात सूर होती. ‘फ’ प्रगागक्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्या देखरेखीखाली कचरा हटविण्याचे काम सूर होते. आयुक्तांनी निर्देश दिल्यामुळे काम सुरु असल्याचेही पवार यांनी सांगितले.