भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

डोंबिवली : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिना निमित्त कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माध्यमातून कल्याण आणि डोंबिवली महानगर पालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम गुरूवार दि. 15 ऑगस्ट रोजी ठीक 7:30 वाजता होणार आहे.

कल्याण महानगरपालिका पालिका प्रगणात महापौर विनिता राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून पालिका आयुक्त गोविंद बोडके उपस्थित राहणार आहेत. तर डोंबिवली विभागीय कार्यालयातील प्रांगणात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास उप महापौर उपेक्षा शक्तिवान भोईर यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी उपायुक्त मारुती खोडके उपस्थित राहणार आहेत.

तसेच महापालिकेच्या वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कॅ. विनय कुमार सच्चान यांच्या स्मारकास सकाळी 8:15 वाजता महापौर विनिता राणे आणि आयुक्त गोविंद बोडके यांच्या उपस्थित पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जनसंपर्क उपायुक्त मिलिंद धाट यांनी केले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे जाहीर व्याख्यान बुधवार, दि. 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता आयोजित केले आहे. सदर व्याख्यान रोटरी  भवन, एम.आय.डी.सी. डोंबिवली पूर्व येथे 5:30 वाजत होणार आहे. निवृत्त मेजर विनय देगांवकर भारताच्या सीमा आणि संरक्षणसिद्धता या विषयावर बोलणार आहेत.

तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हनुमान नगर डोंबिवली तर्फे अखंड भारत संकल दिनानिमित  बुधवार 14 ऑगस्ट रोजी विषय मांडणी आणि स्वातंत्र्य दिवस स्वागत फेरी अंतर्गत रात्रौ 10 वाजता  वक्ता प्रबोधन आणि बहिणाबाई उद्यान सुनीलनार व नवनीत नगर लोढा हेरिटेज येथून स्वागत फेरी निघणार असून नाना धर्माधिकारी हॉल नांदिवली, डोंबिवली (पूर्व) येथे स्वागत फेरीचे राष्ट्रगीतानंतर समापन होणार असल्याची माहिती कार्यवाह मंगेश चुटके यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.