अखेर कडोंमपा परिवहन उपक्रमाची वाशी बस धावली [ मिशन बिगीन अगेन अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु ]

डोंबिवली : महाराष्ट्र शासनाचे अनलॉक धोरण आणि मिशन बिगीन अगेन अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील गर्दी कमी करणे तसेच प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाने डोंबिवली-वाशी प्रवासी बससेवा सोमवारी सकाळी सुरु केली. महापालिका परिवहन उपक्रम व्यवस्थापक मिलिंद धाट यांच्या निर्देशानुसार पूर्वेकडील इंदिराचौक बस स्थानकातून डोंबिवली-वाशी पहिल्या बसची परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. वाशी मार्गावर बस धावणार असल्याने त्या मार्गावरील प्रवाशांचा त्रास काही प्रमाणात कमी होईल अशी चर्चा होती.

कोविड-19 च्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन लॉकडाऊनमुळे संपूर्ण परिवहन उपक्रम बंद करण्यात आला होता. दरम्यान अनलॉक धोरणानुसार काही प्रमाणात व्यवहार सुरु झाले आणि वाहतुकीची समस्या उग्र होवू लागली. नवी-मुंबई, पनवेल विभागात नोकरी व्यवसाय निमित्त प्रवाशांची गर्दी होऊन समस्या निर्माण झाली. त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय संघटनानी पालिका वाहतूक विषयी आंदोलने केली. अखेर पालिका प्रशासनाला वेळीच जाग आली आणि कमीतकमी वाशी बससेवा सूरू करून डोंबिवलीकर प्रवाशांना एक वेगळा पर्याय उपलब्ध झाला.

यावेळी माजी परिवहन सभापती संजय पावशे म्हणाले, डोंबिवली-वाशी मार्गावरून सकाळच्या सत्रात तीन आणि दुपारच्या सत्रात तीन अशा सहा फेऱ्या होणार आहेत. लवकरात लवकर पनवेल बसही सुरु करणार आहोत. पनवेल प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्या मार्गावर बस नक्की धावेल. कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांना पनवेल बस फायद्याची असल्याने याचा विचार करण्यात आला आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत डोंबिवली-वाशी सुरु करण्यात आलेल्या बसमध्ये आसनव्यवस्थेनुसार प्रत्येक आसनावर एक प्रवासी म्हणजे 50 टक्के प्रवासी वाहतूक होणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक मिलिंद घाट यांनी दिली. यावेळी परिवहन सदस्य संजय पावशे, प्रसाद माळी, बंडू पाटील, दिनेश गोरे, आगर व्यवस्थापक संदीप भोसले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.