डोंबिवलीत लोकाग्रहास्तव मनसेचे शासकीय दाखला वाटप शिबीर

डोंबिवली : कोरोना महामारीत गेले अनेक महिने नागरिकांना शासकीय दाखल्यासाठी सरकारी दरबारी वाऱ्या कराव्या लागत होत्या. यामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्रमांक 74 पाथर्ली-गावठाण येथील नागरिकांनी मनसेच्या माजी नगरसेविका मंदाताई सुभाष पाटील यांच्याकडे शासकीय दाखला शिबीर घेण्याची मागणी केली होती. याची दाखल घेत आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर शासकीय दाखला शिबिराचे आयोजन केले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन मंगळवारी मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी जेष्ठ समाजसेवक सुभाष पाटील, मनसे विभाग अध्यक्षा अंजना भोईर, शाखाध्यक्ष रावजी गावडे, मेघा चोरगे, मनसे विद्यार्थी सेनेचे शाखाध्यक्ष ललित पाटील यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय दाखले शिबीर उपक्रम आठवडाभर होणार असून त्यासाठी नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे. या शिबिरात उत्पन्नाचा दाखला, जेष्ठ नागरिक दाखला, डोमिसाईल दाखला, रहिवासी दाखला मिळणार आहे. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळासोडल्याच्चा दाखला, जन्म प्रमाणपत्र, वीजदेयक, विवाहित स्त्री असल्यास लग्नप्रमाणपत्र आदी कागदपत्रे आणि फोटो आवश्यक असल्याची माहिती नावे नोंदणीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला देण्यात येत आहे. सदर सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशी वेळ असून उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनसैनिक विशेष मेहनत घेत आहेत.