डोंबिवली : पालिका प्रशासनाच्या अनोख्या उपक्रमाचा काही प्रमाणात उद्देश सफल झाल्याचे चित्र डोंबिवली महापालिकेच्या प्रांगणात पाहावयास मिळाले. लहानग्यांना माणुसकीची भिंतमधील समानातुन आपल्याला उपयोग्य अशा वस्तू शोधून घेताना ती मिळताच आनंदाने आपल्या मित्रांसह उड्या मारत नाचणारी बच्चे कंपनी हा क्षण वेगळाच होता. यामुळे
एका समाधानकारक माणुसकीचे दर्शन झाले. आपल्या प्रत्येकाच्या घरात चांगल्या सुस्थितीतील परंतू वापरात नसलेल्या अनेक वस्तू असतात.त्या कचऱ्यात टाकणे देखील शक्य नसते. अशा वस्तू जमा करुन गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी राबविण्यात येणारा उपक्रम म्हणजेच “माणुसकीची भिंत” कल्याण डोंबिवली महापालीकेच्या प्रत्येक प्रभाग कार्यालयाजवळ हा उपक्रम सुरु करण्यत आला आहे. डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात हेल्पींग हॅण्ड या सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला डोंबिवलीकर दात्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या माणुसकीच्या भिंतीजवळ तीन मुली आणि एक मुलगा यांनी जमा झालेल्या कपड्यांमधून आपल्या मापाचे कपडे शोधून घेत होते. हे करत असतानाचे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आवडीचा कपडा मिळताच व्यक्त होणारा आनंद यातून अशा उपक्रमाची समाजात किती गरज आहे व येथील दान कसे सत्पात्री लागले याची जाणीव झाली.