डोंबिवली : मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे कोणतेच सण-उत्सव साजरे करता आले नाहीत. आता राज्य सरकारने सर्व निर्बंध शिथिल करून सण-उत्सव साजरे करा परंतु काळजी घ्या असे धोरण जाहीर केल्यामुळे सामाजिक सण-उत्सव साजरे होत आहेत. शिवजयंती, गुढीपाडवा आणि आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव डोंबिवलीत तमाम जनतेने मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला.
शहरात चौका-चौकात जयंतीनिमित्त बॅनर आणि झेंडे फडकत होते. शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून ‘भीम पहाट’ कार्यक्रम आयोजित केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्तचे औचित्य साधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखा माध्यमातून स्व. इंदिरा चौक डोंबिवली पूर्व येथे संगीतमय व प्रबोधनात्मक मराठी वाद्यवृंदाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.
दरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार करून त्यांना अभिवादन केले. यावेळी महापौर विनिता राणे, सदानंद थरवळ, राजेश कदम, भाऊसाहेब चौधरी, शहर प्रमुख राजेश मोरे, माणिक उघडे, तात्या माने, लक्ष्मण मिसाळ, कविता गावंडे, संजय पावशे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात अरविंद मोहिते प्रस्तुत बहुतांची प्रेरणा वाद्यवृंद धम्मपद एक धम्मदेसना अंतर्गत बहारदार गीते सादर करण्यात आली. यावेळी प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांना भीमरत्न पुरस्कार पुरस्कार दिला तर दीपशाम बेढेकर, रोहिणी लोकरे, अर्चना मोहिते, के.आर. सरकटे, निलेश शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांनाही पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
त्यापूर्वी सकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे डोंबिवली अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी इंदिरा चौकातील तसेच शेलारनाका येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तर पश्चिम कडील दीनदयाळ रोडवरील द्वारका चौकात रिपब्लिकन सेनेतर्फे भव्य स्टेज निर्मितीद्वारे जयंती उत्सव साजरा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे आनंद नवसागरे, राजाभाऊ जोशी, आनंद पारदुले, सुरज वाचवेल, कुणाल नाईक, ललिता नवसागरे, रमेश यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ममता हॉस्पिटल माध्यमातून मोफत आरोग्य घेण्यात आले. याचा फायदा अनेकांनी घेतला. दरम्यान मोफत सरबताचे वाटप करण्यात आले.
कोपरगावात माजी नगरसेवक संजय पावशे, शिवसेना शाखा कोपरगाव आणि कै. लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था यांच्यातर्फे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या दरम्यान मिरवणुकीचे स्वागत व अल्पोवर देण्यात आला. सकाळी बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करून बुद्ध पूजाही करण्यात आली. यावेळी अपर्णा संजय पावशे आणि कोपरगाव शिवसेना शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर पश्चिमकडील शिवाजी जोंधळे चौक येथे सम्राट मित्र मंडळ माध्यमातून अध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोफत सरबताचे वाटप करण्यात आले. गेली सोळा वर्ष अशा प्रकारचा कार्यक्रम सुरेश गायकवाड संस्थेच्या माध्यमातून करत असून त्यांना राजू दिवेकर, अजय यादव आणि इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत असते.