विद्यार्थ्यांसाठी जुनी पुस्तके घेण्यावर पालकांचा ओढा

डोंबिवली : उन्हाळ्याची सुट्टी संपून आता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची ओढ लागली आहे. शाळेतील नवीन वर्गाबरोबर नव्या इयत्तेतील अभ्यासक्रम शिकायचा आहे. नव्या वर्गात जातांना सर्व सामुग्री नवी असण्यावर विद्यार्थ्यांचा हेका असतो. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीत सापडलेल्या सर्वसामान्य पालकांना आपल्या पाल्यासाठी नवी पुस्तके खरेदी न करता जुनीच पुस्तके खरेदी करण्याकडे ओढ आहे. परिणामी शहरातील पुस्तक विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या पुस्तकांबाबत विचारणा होत आहे.

डोंबिवली शहराचा विचार केला तर शहरात सुमारे 105 पुस्तक विक्रेत्यांची दुकाने आहेत. मे महिन्याच्या अखेरीस
आणि जून महिन्याच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांसह पालक पुस्तक खरेदी करण्यासाठी येत असतात. यावर्षी इंधन दरवाढ झाल्याने प्रत्येक गोष्टीत वाढ झाल्याने पुस्तक व्यावसायिकांना याची झळ लागली आहे. त्यामुळे शालेय साहित्यावर दरवाढ होऊन विद्यार्थ्यांसाठी सामान खरेदी करतांना पालकांची दमछाक होत आहे.

या विषयाबाबत डोंबिवलीतील विनीत बुक डेपोचे पुस्तक विक्रेते निशिकांत मोडक यांनी सांगितले की, सर्वच शैक्षणिक साहित्य म्हणजे पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, कलर्स, पेपर आदी साहित्यावर सुमारे 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. पुस्तकांच्या किंमती वाढल्या असल्या तरी नवीन पुस्तकांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. देशात कागदाचा तुटवडा असल्याने पुस्तके प्रिंटग कमी होत आहे. पुस्तकांच्या दरवाढीमुळे पालकांना पुस्तके खरेदी करतांना विचार करावा लागत आहे. मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिली ते सातवी शासनातर्फे पुस्तके मिळत असली तरी त्यांना इतर शालेय

समान विकत घ्यावे लागते. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसह इतर साहित्य विकत घ्यावी लागतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या पालकांना आर्थिक चणचण असल्याने त्यांनी आता जुनी पुस्तके खरेदी करण्यावर भर असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे दोन वर्षे कोरोनामुळे लोकांना गावाला जाण्यासाठी सोयीस्कर नव्हते. आता काही प्रमाणात कोरोनापासून निर्बंध शिथील झाल्याने लोकं गावाला गेली आहेत. त्यामुळे मे महिन्यात पुस्तक तसेच इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ग्राहक दुकानातून दिसत नाही. आता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गावाला गेलेले लोकं येईल त्यानंतर दुकानांतुन ग्राहकांकडून खरेदी होईल. मात्र असे असले तरी पालकवर्ग जुन्या पुस्तस्कांबाबत विचारणा करीत असतात असे मोडक यांनी सांगितले.