डोंबिवली : ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री गणेश मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहे. ज्यावेळी एखाद्या देवस्थानाला 100 वर्ष पूर्ण होतात त्या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचे दर्जा प्राप्त होत असतो. डोंबिवली श्री गणेश मंदिरात जीर्णोद्धारावेळी गाभाऱ्याला चांदीचा मुलामा देऊन इतर सुशोभीकरण करत आहे. पुढील पिढीसाठी या मंदिरात अशा योजना होत आहेतह. बाप्पाच्या गाभाऱ्यातील काम सुरु असून त्या कामाकरता 100 ते 150 किलो चांदी अपेक्षित आहे. या कामासाठी बऱ्याच पैकी चांदी आली आहे. श्रीगणेश मंदिर संस्थान यासाठी अनेक भाविकांपर्यत जात असून त्यांना आवाहन करत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातूनही आवाहन करण्यात आले होते. त्या माध्यमातून नांदेड येथील दानशूर व्यक्ती सुमित मोगरे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 30 किलो वजनाची चांदीची वीट अर्पण केली आहे. शनिवारी 10 तारखेला ही वीट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत श्री गणेश मंदिर संस्थानला देण्यात आली.
या जीर्णोद्धारामुळे मंदिराचे ऐतिहासिक महत्व जपले जाईल आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे असे राहुल दामले यांनी सांगितले व श्री गणेशाचरणी चांदीची वीट अर्पण करणाऱ्या सुमित मोगरे यांचे मंदिर समिती तर्फे आभार मानले तसेच संस्थानच्या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण, मंदिराच्या अध्यक्षा अलकाताई मुतालिका, राहुल दामले, प्रवीण दुधे, डॉ. विनय वेलणकर, श्रीपाद कुळकर्णी यांच्यासह मंदिर संस्थान कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते