डोंबिवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या उदघाटनसाठी डोंबिवलीत येणार आहेत. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही येणार असून आगरी समाजाचे समग्र दर्शन घडविणारा २० वा अखिल भारतीय आगरी महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे. तसेच रामशेठ ठाकूर (मा. खासदार), जगन्नाथ पाटील (मा. मंत्री), दशरथ दादा पाटील (ज्येष्ठ सामाजिक नेते), कपिल पाटील (माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री), गणेश नाईक (आमदार व माजी मंत्री ) खासदार सुरेश म्हात्रे, खासदार संजय दिना पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मान्यवर उपस्थित उदघाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आगरी युथ फोरम, डोंबिवलीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी डोंबिवलीत शुक्रवारी आगरी महोत्सव आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पूर्वेकडील रामनगर येथील सुरभी हॉटेल येथे याबाबतची माहिती देताना अध्यक्ष गुलाब वझे यांनी मंगळवार 10 डिसेंबर ते मंगळवार 17 डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत रोज दुपारी 4 ते रात्रौ10 या वेळेत अनेक सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन अशा विविधरंगी कार्यक्रमाची रेलचेल असणार असल्याचे सांगितले. यावेळी. संस्थेचे कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, पदाधिकारी शरद पाटील, भानुदास भोईर, संतोष संते, गुरुनाथ म्हात्रे, जयेंद्र पाटील, प्रवीण पाटील, कांता पाटील, अशोक पाटील, अनंत पाटील, दत्ता वझे, प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये समाजातील प्रसिद्ध गायक जगदीश पाटील, बिग बॉस फेम, दादूस – संतोष चौधरी, गायक योगेश आग्रावकर, रॉक सिंगर सपना पाटील, बदामचा बादशहा सुजित पाटील यांचा सहभाग असणार आहे. मराठी भाषा प्रांतातील साहित्यिकांचा सहभाग असलेल्या परिसंवादाचे आयोजन असून या परिसंवादामध्ये अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे मा. अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, 91 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे उपस्थित राहणार आहेत. दररोज नवोदित हौशी कलाकार, शालेय विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार पहावयास मिळणार आहेत. त्याचप्रमाणे कलर्स मराठी वाहिनीवरील प्रक्षेपित होणारी लोकप्रिय मालिका लय आवडते तू मला, अशोक मामा व पिंगा ग पोरी पिंगा या मालिकांमधील तसेच मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी या चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार महोत्सवमध्ये सदिच्छा भेट देणार आहेत.