मुजोर रिक्षाचालकाची होमगार्डला धमकी

डोंबिवली, २७ (प्रतिनिधी) : मुजोर रिक्षाचालकांची दादागिरी सर्वसामान्यांना होते ही बाब नित्याचीच होत असताना आता त्याचा त्रास कर्तव्य बजावीत असणाऱ्या होमगार्डनां होत आहे. रहदारीच्या केळकर रोडवर आरोपी रिक्षा चालक नामदेव खाडे याने एका होमगार्डला धमकी दिल्याची घटना उघड झाली आहे.

पूर्वेकडील केळकर रोडवरील वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी होमगार्ड कार्यरत होते. बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास केळकर रोडवर कल्याण-शिळ रोडवरील कोळेगाव येथे राहणारे रिक्षा क्रमांक एमएच 05/सीजी/7994 रिक्षा चालक खाडे याला रिक्षा लाईन मध्ये लावा इथे गर्दी कशाला करता असे सांगताच खाडे याने होमगार्डला दमदाटी करीत अंगावर जोरजोरात ओरडून धमकी दिली. मुख्य म्हणजे वाहतूक कोंडी मोकळी करण्याच्या कर्तव्यापासून प्रवृत्त केले. या घटनेची नोंद डोंबिवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अद्यापपर्यंत धमकी देणाऱ्या मुजोर रिक्षा चालकास अटक करण्यात आली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.