डोंबिवली : पश्चिमेतील देवीचा पाडा मोठागाव येथील ग्रामदेवता श्री गावदेवी लोटू आईच्या यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून गावदेवी पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण कोकण पट्ट्यात प्रसिद्ध आहे. गुरुवारी सायंकाळी देवीची पालखी सोहळा संपन्न झाला. गुरुवार व शुक्रवारी असे दोन दिवस जत्रा भरते. या यात्रेला ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आदी परिसरातून हजारो भाविक दर्शनाला येत असतात.

मोठागाव, देवीचा पाडा अशा सात पाड्यांची देवता हीच डोंबिवलीची ग्रामदेवता गावदेवी म्हणून ओळखली जाते. देवी वाघावर आरूढ झाली असल्याने तिला वाघाई, वाघेश्वरी वा लोटूआई देखील म्हणतात. पूर्वी गावकीच्यावतीने गावदेवी यात्रेचे आयोजन करण्यात येत असे. आता गावकऱ्यांनी मिळून गावदेवी मंदिर संस्थान ट्रस्ट निर्माण केला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून या यात्रेचे संपूर्ण नियोजन करण्यात येते. चैत्र सप्तमी व अष्टमी असे दोन दिवस यात्रा भरत असते. पहिल्या दिवशी पालखी सोहळा असतो. दुसऱ्या दिवशी नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. यात्रा निमित्ताने मंदिराला सुंदर अशी रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
देवीचा पाडा व मोठागाव येथून मंदिरात पालखी वाजत गाजत व नाचत आणली जाते. पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांची रस्त्यावर मोठी गर्दी उसळते. पालखी सोहळा पार पाडल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला प्रारंभ होत असतो. यात्रेत मंदिरासमोरील मैदानात मोठा आनंद मेळा भरतो. ग्रामीण भागातील यात्रेत असणारे आकाश पाळणे व विविध प्रकारची खेळणी या यात्रेच्या आकर्षणाचे केंद्र असते. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या वस्तू वा खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटलेली असतात. सालाबादप्रमाणे कुस्तीचे जंगी सामने देखील भरविण्यात आले आहेत. या गावदेवीच्या या यात्रेला डोंबिवली, कल्याण, भिवंडी, ठाणे परिसरासह पालघर, रायगड, मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणावर हजारो भाविक येत असतात. देवीची ओटी भरण, नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळत असते.त्यादृष्टीने गावदेवी मंदिर संस्थानच्यावतीने चोख नियोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री गावदेवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष व माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांनी दिली.
