डोंबिवली : दहीहंडी उत्सवानिमित्त डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी भव्य आयोजन करण्यात आले असून गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पूर्वेकडील कावेरी चौक, गांधी चौक तर पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील पारंपरिक मथुरा हंडी फोडण्यासाठी मोठ्या संख्येने गोविंदा पथके सहभागी झाली.

एमआयडी निवासी विभागातील कावेरी चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या सहकार्याने पहिल्याच वर्षी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. आयोजक आनंद पवार, सिद्धेश पाटील आणि अजय शेलार यांनी थरावर थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांचे स्वागत करून त्यांनी ट्रॉफीचे बक्षीस दिले.

मानपाडा जवळील गांधी चौक येथे गांधीनगर मित्र मंडळ दरवर्षी दहीकाला उत्सवाचे आयोजन असते. नवव्या वर्षी ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी गोविंदा पथकांनी थर लावताना हार्नेस, सेफ्टी बेल्टसह आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेतेमंडळी या उत्सवात सहभाग घेऊन एकत्रित आनंद घेतात असे प्रतीक पाटील सांगतात.

पश्चिमेकडील जुनी आणि पारंपरिक मथुरा हंडी उत्सवाने यंदा ४१व्या वर्षात पदार्पण केले. वैशिष्ट्य म्हणजे अनेक गोविंदा पथके पुढील हंड्यांकडे जाण्यापूर्वी येथे सलामी देण्याची परंपरा जपतात. ही हंडी केवळ बक्षिसांसाठी नव्हे तर सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी आयोजित केली जात असल्याचे विश्वस्त जितेंद्र भोईर यांनी सांगितले. गोविंदा पथकांनी उत्साहासोबतच सुरक्षिततेला प्राधान्य देत तंटामुक्त आणि आनंदी वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करावा असे आवाहन आयोजकांनी केले.
