“मनुष्य मन व माणुसकी ग्रुप” व्हाटसअप ग्रुपचे आगळे-वेगळे समाजकार्य
डोंबिवली, दि. २८ (प्रतिनिधी) : अंध व आदिवासी कुटुंबांचे संपूर्ण पालकत्व स्विकारुन आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून त्यांच्या साठी निस्वार्थ समाजसेवेचे व्रत घेतलेल्या “मनुष्य मन व माणुसकी” या व्हाटस् अप ग्रुप ला आता समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
समाजातून मिळालेल्या प्रतिसादामुळे नुकतेच 70 विद्यार्थ्यांसाठी रेनकोट, चप्पल, स्कूल ब्याग व वह्या यांचे वाटप करण्यात आले. तसेच वांगणी येथील अंध वस्तीत व रिटघर आदिवासी पाडा (न्यू पनवेल माथेरान रस्ता) येथे आदिवासी पाड्यावर सुमारे तीस घरात एक छत्री व महिनाभर पुरेल इतके धान्य याचे वाटप केले. रिटघर येथील बहुसंख्य आदिवासी लोक विटभट्टीवर काम करीत असतात. पावसाळ्यात सदर वीटभट्टया बंद असल्याने त्यांना काही रोजगार नसतो व त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये या माणुसकीच्या भावनेने या ग्रुपने हे सामाजिक कार्य केले.
व्हाटस् अप वर केवळ चॅटिंग करुन वेळ वाया न घालवता ठाणे ते बदलापूरचे सदस्य असलेल्या या ग्रुपचे शैलेश राणे यांनी बॅगसाठी, रवींद्र केळकर यांनी वह्यांसाठी, अलका देशपांडे यांनी धान्य वाटप खर्च उचलला. स्वाती प्रधान यांनी दोन्ही कार्यक्रमास त्यांच्या मित्रमंडळीकडून भरघोस आर्थिक मदत मिळवून दिली. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती नागले, शैला डेकाटे, संगीता चित्रे,नंदा खोपकर,अमृता कारखानीस, पूनम चपटे, केयुरी अधिकारी, प्रेरणा प्रधान, सोनिया जोशी, मधूबिका चॅटर्जी, शैलेश राणे, प्रवीण प्रधान, सुभाष पाष्टे, शैलेश बोरसे, जयेश अधिकारी आदी सदस्यांनी भरपूर मेहनत घेतली.
आम्ही सर्वजण रिटघर व वांगणी येथील शाळकरी मुलांना नुसत्याच त्यांच्या प्रार्थमिक गरज पुरवून थांबणार नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहोत व त्यासाठी आमची एक वेगळी टीम तयार केली असून ती टीम मुले व शाळाना सतत भेटून यासाठी काम करणार आहेत. तसेच या दोन्ही ठिकाणी घरातील सदस्यांना रोजगार मिळावा म्हणून कागदी पिशव्या बनवणे, उदबत्त्या बनवणे व विक्री यावर लक्ष केंद्रित करणार आहोत असे “मनुष्य मन व माणुसकी ग्रुप” चे संस्थापक विजय देशमुख यांनी सांगितले.