कल्याण, दि. १ (प्रतिनिधी) : आयुक्त फक्त भाजपा नगरसेवकांची कामे करतात. सेना नगरसेवकांच्या फायलीकडे दुर्लक्ष करतात असा आरोप करून आज सकाळी चिडलेल्या काही सेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयावर घडक मारली. या प्रकारामध्ये काही नगरसेवकांनी आयुक्तांची खुर्ची फेकून देत आयुक्त पदावरून दूर व्हा अशी मागणी केली. तर महिला नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर “आयुक्त हटाव, पालिका बचाव” अशा घोषणा देत वेगळा पवित्रा दाखवला.
याबाबत नगरसेवकांचे असे म्हणणे होत की, नगरसेवक पदाचा पदभार स्वीकारून दोन वर्षे झाली तरी पाणी, रस्ते आणि कच-याचा प्रश्न तसाच आहे. अद्यापपर्यंत आम्ही ते प्रश्न तडीस लावू शकलो नाही. या कामांसाठी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारले तर त्यांच्याकडे उत्तरच नसते. पण याउलट भाजपा नगरसेवकांची कामे व्यवस्थितपणे होत असतात हे कसे, असे अनेक प्रश्न आहेत.
यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. एकीकडे शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने आधीच सेनेची नाचक्की झाली आहे. त्यात सत्ताधारी पक्षाला विकास कामांसाठी व नागरी समस्या सोडविण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे यासारखे दुसरे दुःख नाही अशी विधाने शहरात होत आहेत.