प्रवाशाच्या धक्काबुक्कीत तिकीट तपासनीस जखमी

डोंबिवली, दि. ९ (प्रतिनिधी) : रेल्वे स्थानकावरील जिन्यावर तिकीट तपासण्याचे काम करत असलेल्या तिकीट तपासनीस आर. जी. कदम याना प्रवाशाने धक्का दिल्यामुळे ते पडले आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अत्यावस्थ असलेल्या कदम यांच्यावर डोंबिवलीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यानी सांगितले. मात्र अजूनही कदम कोमात असून त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

काल रबाळे रेल्वे स्थानकातील जिन्यावर तिकीट तपासत असताना तिकीट तपासनीस आर. जी. कदम (५७) यांना अज्ञात प्रवाशाने दिलेल्या धक्क्यात ते डोक्यावर पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डोक्यात रक्तस्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्यामुळे रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता यांनी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान तातडीने त्यांना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे तातडीने उपचार करणे गरजेचे होते. एम्स रुग्णालयातील डॉ. अभिजित कुलकर्णी आणि संदीप कडीयन यांनी तब्बल दोन तासाच्या शस्त्र क्रियेत त्यांच्या मेंदूच्या डाव्या बाजूला साचलेले रक्त काढून होणारा रक्तस्त्राव बंद केला. दरम्यान शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी अद्याप कदम कोमात असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.

दुर्दैवाने हा अपघात स्थानकातील जिन्यावर घडला असून याठिकाणी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे आरोपीचा शोध घेणे जिकरीचे झाले आहे. मागील ८ महिन्यात तब्बल १२ तिकीट तपासणीसावर जीवघेणे हल्ले झाल्यामुळे तिकीट तपासणीस भीतीच्या छायेत वावरत असलेल्या भारतीय रेल्वे तिकीट तपासणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी तिकीट तपासणीसाना सरक्षण मिळावे अशी मागणी केल्याचे सेक्रेटरी व्ही पी सिंग यांनी सांगितले.