रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या गणेश मंदिरावर पालिकेची कारवाई

डोंबिवली, दि. १० (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या रस्तारुंदीकरण पथकाने धडक कारवाई करत रस्त्याला अडथळा ठरत असलेल्या जुन्या गणेश मंदिरावर कारवाई करून मंदिर जमीनदोस्त केले. त्या अगोदर मंदिराचे खाजगी मालक लक्ष्मण पाटील यांच्याकडे मंदिरातील गणेशाची मूर्ती सुपूर्द केली. परंतु ऐन सणासुदीच्या दिवसात आणि येणाऱ्या गणेश उत्सवाच्या काळातच पालिकेने केलेल्या कारवाईमुळे वातावरण थोडे तंग झाले होते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे “ह” प्रभागक्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांनी आपल्या फौजफाट्यासह आज सकाळी सदर मंदिरावर कारवाई करण्यात आली. मंदिराचे मालक पाटील यांना दोन वेळा याविषयी नोटीस देण्यात आली होती. हाय कोर्ट-सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्याच्या शेवट पर्यंत रस्त्यावरील मंदिरे निष्कासित करायची आहेत. अशाप्रकारच्या यादीत हे मंदिर होते. पश्चिम विभागातील हे मंदिर रेल्वे स्थानकासमोर आहे. 7 ऑगस्ट रोजी आयुक्तांनी मिटिंग घेतली यावेळी डीसीपी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. या मिटींगमध्ये “ह” प्रभागक्षेत्राला 10 ऑगस्ट ही तारीख दिली होती त्याप्रमाणे कारवाई केली आहे. अंदाजे १९८० रोजी हे मंदिर बांधण्यात आले होते. प्रतीवर्षी या मंदिराच्या जवळच रिक्षा युनियनचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.

यावेळी वानखेडे म्हणाले, पश्चिमेत यापूर्वी तीन मंदिरे निष्कासित करण्यात आली आहेत हे चौथे मंदिर आहे. तसेच ह प्रभाग क्षेत्रात जी काही अनधिकृत बांधकामे होत आहेत त्यावरही कारवाई करण्यात येईल. पूर्वीही कारवाई झाली आहे. यावेळी पूर्वेकडील “फ” प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत व पालिकाधिकारी उपस्थित होते.